कार्वेच्या ग्रामसभेकडे ग्रामस्थांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:06+5:302021-09-07T04:46:06+5:30
कार्वेची ग्रामसभा गत दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे ग्रामसभांना मुभा ...

कार्वेच्या ग्रामसभेकडे ग्रामस्थांची पाठ
कार्वेची ग्रामसभा गत दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे ग्रामसभांना मुभा देण्यात आली असून, कार्वेतही ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सभेकडे ग्रामस्थांनी पाठ फिरविली. सरपंच संदीप भांबुरे तसेच उपसरपंच प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. अहवालवाचन ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केले. यावेळी राज्य शासनाने राज्यभर विविध योजना, विकासकामे, महिला बालकल्याण योजना, अपंगांसाठीच्या योजना, शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी मिळणारे अनुदान, वृक्षारोपण आदी योजना राबविण्यास सुरुवात केली असून कार्वेतही या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायतीच्या विविध समिती नेमणुका करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या सर्व समितीचे अध्यक्ष सरपंच असतील, असेही सूचित करण्यात आले. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची निवड करण्यात यावी, अशी सूचना करून विविध ठराव करण्यात आले.
यावेळी कोरोना संसर्ग काळात गत दीड वर्ष ग्रामस्थांना अनेक संकटांचा सामना करावा लागला असून, त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या बिलामध्ये २५ टक्के सवलत देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामस्थांनी आपली पाण्याची बिले दहा दिवसांत भरावीत, असे आवाहन करण्यात आले. ग्रामसभेत वैभव थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. अधिक गुजले यांनी आभार मानले.
फोटो : ०६केआरडी०१
कॅप्शन : कार्वे, ता. कऱ्हाड येथील सभागृहात ग्रामसभा शांततेत पार पडली. यावेळी सरपंच संदीप भांबुरे अध्यक्षस्थानी होते.