महामार्गालगतच्या अडचणींमुळे ग्रामस्थ हैराण ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:42 IST2021-09-18T04:42:03+5:302021-09-18T04:42:03+5:30
खंडाळा : पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. दळणवळणाच्या सोयीसाठी व वाहतूक अधिक गतिमान होण्यासाठी ...

महामार्गालगतच्या अडचणींमुळे ग्रामस्थ हैराण ...
खंडाळा : पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. दळणवळणाच्या सोयीसाठी व वाहतूक अधिक गतिमान होण्यासाठी महामार्गात हे बदल करण्यात आले असले तरी कामे खोळंबल्याने अडचणी वाढत आहेत. वास्तविक, या राष्ट्रीय महामार्गाचे रूपांतर आशियाई महामार्गात केले असले तरी सध्या हा बदल केवळ नावापुरताच दिसून येतोय. महामार्गालगतच्या गावांच्या अडचणी मात्र तशाच असल्याने ग्रामस्थ हैराण आहेत.
पुणे-बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीच्या अडचणी दूर करण्यासाठी या मार्गाचे सुरुवातीला चौपदरीकरण व त्यानंतर सहापदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. या कामादरम्यान अनेक गावांतील रस्त्यालगतच्या अडचणी वाढत गेल्या आहेत. मात्र, यावर तोडगा काढण्यापूर्वी केवळ नावात बदल करून त्याचे नामकरण आशियाई महामार्ग-४७ असे करण्यात आले आहे. त्यामुळे समस्या सुटलेल्या नाहीत.
खंडाळा तालुक्यात पारगाव येथील महामार्गालगत दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यांचे रुंदीकरण करणे, अंडरपास बोगदा दोन्ही बाजूंनी काँक्रिट भिंत बांधून बंदिस्त गटार करणे, अंडरपास एलईडी दिवे बसविण्यात यावेत, सेवारस्त्यालगत दोन्ही बाजूने गटार काढणे, एसटी बसस्थानकासमोरील बोगद्यात लोखंडी, अथवा स्टील खांब बसविण्यात यावेत, गाव हद्दीत रस्त्याकडेला दुतर्फा लाईटची सोय करणे, अशी अनेक कामे अपूर्ण आहेत. तसेच खंडाळा बसस्थानक ते सातारा मार्गावरील सेवा रस्त्यालगत असणाऱ्या विहिरी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे नावात बदल होत असताना कामातही तत्परतेने तोडगा निघावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.
(कोट)
महामार्गाच्या रुंदीकरणाने दळणवळण सुविधा सुरळीत झाल्या असल्या तरी सेवारस्ते, अंडरपास बोगदे व इतर सुविधा चांगल्या रीतीने मिळणे गरजेचे आहे. कामे अपूर्ण राहिल्याने शेतकरी वर्गाची मोठी अडचण झाली आहे. बसस्थानक ते सातारा रोडपर्यंतच्या सेवारस्त्यालगतची विहीर धोकादायक आहे. ती बुजवून सेवा रस्त्याची रुंदी वाढवणे गरजेचे आहे.
- युवराज ढमाळ, सामाजिक कार्यकर्ते, पारगाव
फोटो आहे.
१७ खंडाळा
खंडाळा बसस्थानक ते सातारा महामार्ग सेवा रस्ता अरुंद व दुरवस्था असल्याने वारंवार अपघात होत असतात.