सातारच्या नगराध्यक्षपदी विजय बडेकर बिनविरोध
By Admin | Updated: October 16, 2015 00:05 IST2015-10-15T00:07:30+5:302015-10-16T00:05:07+5:30
उपनगराध्यक्षपदी ‘नगरविकास’चे जयवंत भोसले

सातारच्या नगराध्यक्षपदी विजय बडेकर बिनविरोध
सातारा : सातारच्या नगराध्यक्षपदी सातारा विकास आघाडीचे विजय बडेकर, तर उपनगराध्यक्षपदी नगर विकास आघाडीचे जयवंत भोसले यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वत: पालिकेत उपस्थित राहून नगराध्यक्ष बडेकर व उपनगराध्यक्ष भोसले यांना संयुक्तपणे एक पुष्पहार घातला.
सातारा नगरपालिकेमध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाची सत्ता आहे. सव्वावर्षासाठी दोन्ही आघाड्यांनी पदे वाटून घेतली आहेत. २०१६ रोजी होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीला केवळ सव्वा वर्ष बाकी आहे. तत्पूर्वी या वर्षाचा शेवटचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ ठरल्याप्रमाणे (पान ९ वर)
‘साविआ’कडे होता. गेल्या आठवड्यात नगराध्यक्ष सचिन सारस व उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर पालिकेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. ‘साविआ’कडून नगराध्यक्षपदासाठी विजय बडेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित झाली होती. केवळ त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी होती. मात्र, ‘नविआ’कडून भालचंद्र निकम, जयवंत भोसले, महेश जगताप, दीपलक्ष्मी नाईक हे चारजण उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. शेवटच्या दिवसापर्यंत उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याविषयी ‘सस्पेन्स’ कायम होता. बुधवारी सकाळी अकरा वाजता नगरसेवक जयवंत भोसले यांंनी अर्ज भरल्यानंतरच उपनगराध्यक्षपदी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले. दुपारी बारापर्यंत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी केलेल्या अर्जाची प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी छाननी केली. त्यानंतर दुपारी दोन वाजता या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट, ‘साविआ’ आणि ‘नविआ’चे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. निवडी जाहीर झाल्यानंतर नूतन नगराध्यक्ष विजय बडेकर व उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांची त्यांच्या समर्थकांनी शहरातून मिरवणूक काढली. (प्रतिनिधी)