पशुसंवर्धन विभाग सतर्क

By Admin | Updated: April 18, 2015 00:04 IST2015-04-17T22:38:05+5:302015-04-18T00:04:27+5:30

संगमेश्वर तालुका : शेतकरी मोहिमेत सहभागी होणार

Vigilance Department of Animal Husbandry | पशुसंवर्धन विभाग सतर्क

पशुसंवर्धन विभाग सतर्क

मार्लेश्वर : पावसाळ््यात होणाऱ्या पायलागाची शक्यता गृहित धरून जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून संगमेश्वर तालुक्यात पायलाग लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यात ४६ हजार पाळीव जनावरांमध्ये या साथीचा फैलाव होऊ नये यासाठी ही जागृती करण्यात येत असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यात गेल्या ाही वर्षात अशा साथीबाबत शेतकरी पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, याबाबत यावर्षी प्रथमच दक्षता घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणऊन ही काळजी घेतली जात आहे. जनावरांमध्ये आढळणाऱ्या पायलाग रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनातर्फे संगमेश्वर तालुक्यातील सुमारे ४६ हजार पाळीव जनावरांसाठी पायलाग लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला नुकताच प्रारंभ झाला असल्याची माहिती पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय धने यांनी दिली आहे.
पाळीव जनावरांना होणारा पायलाग हा रोग पावसाळ्याच्या अगोदर उन्हाळ्यात बहुतांश प्रमाणात होतो.
हा रोग डुकरांपासून साधारणपणे गाय, बैल, म्हशीला होतो. या रोगांची लागण झाल्यानंतर जनावरांच्या पायातील व खुरामध्ये लागण होऊन जखम होते व जखमेमध्ये किडी होतात. तसेच तोंडालासुद्धा जखम होते. रोगाची लागण झालेले जनावर काही खात पीत नाही. तसेच जनावराला तापही येतो व हा ताप कमी होत नाही.
पावसाळ्यामध्ये कोकणात शेती व्यवसाय केला जातो. पावसाळ्याच्या सुरुवातीला नांगरणीसाठी बैलांची शारीरिक स्थिती मजबूत असणे आवश्यक असते. त्यामुळे शासनाने एप्रिल महिन्यातच पायलाग लसीकरण मोहीम सुरु केली आहे. तालुक्यातील ४६ हजार पाळीव जनावरांना २३ पशुवैद्यकीय संस्थांमधील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत ही लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
या मोहिमेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेची ३० एप्रिल रोजी सांगता केली जाणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)

पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण
जनावरांना पायलाग होऊन त्यांना नाहक शारीरिक व्याधीला सामोरे जावे लागू नये यासाठी शेतकऱ्यांनी काही खबरदारीचे उपाय घेणे गरजेचे आहे. नजीकच्या पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करुन त्यावरील उपाय योजणे गरजेचे आहे. शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या लसीकरणासारख्या योजनांचा शेतकरीवर्गाने फायदा घेऊन आपली जनावरे या रोगापासून कशी बचावतील याकडे कटाक्षाने देणे गरजेचे आहे. पशुसंवर्धनतर्फे ही हाती घेण्यात आली आहे.

Web Title: Vigilance Department of Animal Husbandry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.