हजारो भाविकांकडून समाधीचे दर्शन
By Admin | Updated: December 9, 2014 23:23 IST2014-12-09T21:26:33+5:302014-12-09T23:23:17+5:30
गोंदवलेत धार्मिक कार्यक्रम : भक्तिमय वातावरणात रंगली भक्तिसंगीताची मैफल

हजारो भाविकांकडून समाधीचे दर्शन
गोंदवले : श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या १०१ व्या पुण्यतिथी महोत्सवास कोठी पूजनाने प्रारंभ करण्यात आला. बुधवार, दि. १७ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात हजारो भाविकांनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज महोत्सवात सभा मंडपात पहाटे ब्रम्हानंद महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विश्वस्त जयवंतराव परांजपे यांनी महाराजांच्या पादुकांचे पूजन केले. यावेळी अक्षय पिशवी आणि महोत्सवासाठी राखून ठेवण्यात आलेल्या पैशांचे पूजन केले. गोशाळा अग्निपूजन केले.
मंदिरात अखंड पहारा सुरू करण्यात आला. मंदिरात अ. श. वाडेकर यांचे प्रवचन, मकरंदबुवा कळंबेकर, प्रज्ञा वाळिंबे, चिन्मय देशपांडे, रामनाथबुवा अय्यर यांचे गायन, गिरिजाबाई बदोडेकर, सीमा विध्वंस यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम तसेच विविध ठिकाणच्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.
कोठी पूजनप्रसंगी विविध फळे, भाज्या धान्यांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली. भोपळ्याची होडी, कोबीची बाहुली, कलिंगडचे कासव करून आरास करण्यात आली. यावेळी भाविकांनी गर्दी केली होती.
महोत्सवा दरम्यान बाबा बेलसरे यांची ध्वनिचित्रफित दाखवण्यात येत आहे. तसेच डॉ. मधुसूदन बागडे, स्वामी नारायणानंद सरस्वती, रवी पाठक यांचे प्रवचन दाखविण्यात येत असून दि. १७ डिसेंबर रोजी गुलाल फुलांच्या कार्यक्रमाने पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होणार
आहे. (प्रतिनिधी)