वाईची डॉक्टरकी कसायाच्या दावणीला!

By Admin | Updated: August 19, 2016 00:16 IST2016-08-18T23:55:36+5:302016-08-19T00:16:09+5:30

चौकातील फ्लेक्सवर ‘आयएमए’च्या शुभेच्छा : रुग्णवाहिका चालविणारा म्हणे चक्क ‘आयसीयू’ डॉक्टर

Vichy doctor's rue! | वाईची डॉक्टरकी कसायाच्या दावणीला!

वाईची डॉक्टरकी कसायाच्या दावणीला!

‘सहा निष्पाप जिवांचा बळी घेणारा संतोष पोळ डॉक्टर नव्हताच,’ असे आता छाती ठोकून सांगणारी काही डॉक्टर मंडळी पुढे सरसावली असली तरी गेली अनेक वर्षे या संतोषने वाईची डॉक्टरकी आपल्या दावणीला बांधल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे. घोटवडेकरांची रुग्णवाहिका चालविणारा हा संतोष कागदोपत्री ‘आयसीयू डॉक्टर’ होता. तसेच हा महाभाग डॉक्टर नाही, हे माहीत असूनही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या फ्लेक्स बोर्डावर झळकत होता. तो ‘आत’ गेल्यानंतर आता त्याच्या नावाने खडे फोडणारी मंडळी इतकी वर्षे का गप्प होती, असाही प्रश्न आता निर्माण झालाय.
राहुल तांबोळी ल्ल भुर्इंज
‘संतोष पोळ हा आपल्या घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होता. डॉक्टर म्हणून तो आपल्याकडे काम करतच नव्हता, असे आता पोटतिडकीने सांगणाऱ्या डॉ. विद्याधर घोटवडेकर याचा दावा धादांत खोटा असल्याचे ‘लोकमत’च्या निदर्शनास आले आहे. संतोष पोळ हा डॉक्टर म्हणूनच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कामाला होता, आयसीयूतील सर्व रुग्णांवर तोच उपचार करत होता,’ असे स्वत: डॉ. घोटवडेकर यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी एका घटनेत दिलेल्या जबाबात म्हटले आहे. विशेष म्हणजे, हा जबाब पोलिस निरीक्षकाने नोंदवला असून, त्यावर आता डॉ. घोटवडेकर यांचे काय म्हणणे आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संतोष पोळ याने सहापेक्षा अधिक खून केले असतील, केवळ पैशाच्या हव्यासापोटी नव्हे तर त्यापेक्षाही भयंकर कारणासाठी हे खून केले असतील, त्याच्या या कृत्यात अनेक साथीदार असतील, अशा अनेक शंका-कुशकांनी हे समाजमन ढवळून निघत आहे. विचारांच्या या गर्तेतच अनेकांच्या नजरा घोटवडेकर हॉस्पिटलकडे वळत आहेत. संतोष या हॉस्पिटलमध्येच पोसला गेला, अशी भावना मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र ‘संतोष हा डॉक्टर म्हणून आपल्याकडे कामाला नव्हता तर मदतनीस म्हणून कामाला होता, आपण केलेल्या तक्रारीमुळेच पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे,’ असा दावा घोटवडेकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. विद्याधर घोटवडेकर यांनी केला आहे.
असे असले तरी ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या काही कागदपत्रांत मात्र डॉ. घोटवडेकर यांनीच पोळचा उल्लेख ज्या-ज्यावेळी आला आहे त्या-त्या प्रत्येकवेळी ‘डॉक्टर’ असाच केला आहे. तसेच त्यांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या याच जबाबात स्वत:चे शिक्षण एमबीबीएस असल्याचे सांगून म्हटले आहे की, ‘२००६ मध्ये घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये संचित आयसीयू विभाग सुरू केला. त्या विभागावर मी (म्हणजे घोटवडेकर यांनी) वाई येथील डॉ. संतोष गुलाबराव पोळ यांना कामासाठी ठेवले आहे. या आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट झालेल्या सर्व पेशंटवर उपचार डॉ. पोळ करतात. संचित आयसीयू विभागाचे जनसंपर्क अधिकारी तसेच या विभागातील सर्व आर्थिक व्यवहाराचे काम करण्यासाठी मी डॉ. पोळ यांनाच नेमले आहे.’


काही दिवसांपूर्वी वाईच्या चौकात आमच्या इंडीयन मेडिकल असोसिएशन वाई शाखेच्या वतीने एक फ्लेक्स लावल्याचे समजताच मी आश्चर्यचकीत झालो. याबाबत संतोष पोळला फोन करून विचारले असता त्यानेच स्वत:हून हा बोर्ड लावल्याचे कबूल केले तेव्हा तातडीने हा बोर्ड काढण्याबाबत समज दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो गायब झाला. तो उचापत्याखोर आहे, याबद्दल आम्ही अनेकांशी यापूर्वीही वेळोवेळी चर्चाही केली होती.
- डॉ. सतीश बाबर,
अध्यक्ष, आयएमए, वाई

घोटवडेकरांच्या पोलिस जबाबात संतोष हा चक्क ‘आयसीयू’चा डॉक्टर

एका महत्त्वपूर्ण घटनेत आणि एका अतिशय जबाबदार अशा पोलिस निरीक्षक अधिकाऱ्यासमोर जबाब देताना संतोष पोळचा उल्लेख प्रत्येकवेळी ‘डॉक्टर’ असाच करणारे घोटवडेकर आता मात्र संतोष पोळ हा डॉक्टर नाही आणि तो डॉक्टर म्हणून आपल्याकडे कामाला नव्हताच, असे कसे म्हणू शकतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर याच जबाबात त्यांनी संतोष पोळ हाच आयसीयूतील सर्व रुग्णांवर उपचार करत होता, हेही सांगितले आहे.
४याहीपेक्षा आणखी भयानक म्हणजे जमावाच्या मारहाणीत घोटवडेकर हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला; मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी तो तरुण कर्मचारी जखमी झाला होता. आणि त्या जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला संतोष पोळ हाच अ‍ॅम्ब्युलन्समधून घेऊन साताऱ्याला गेला होता, अशी चर्चा आहे. त्यावेळी त्या कर्मचाऱ्याला साताऱ्याला घेऊन जाताना वाटेतच त्या कर्मचाऱ्याचा जमावाच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे नंतर सांगण्यात आले. या प्रकरणाकडेही आता संशयाने पाहिले जात असून, त्याचीही चौकशी होण्याची मागणी होत आहे.
दोघांचा खून अ‍ॅम्ब्युलन्समध्ये केल्याची कबुली स्वत: संतोष पोळ याने दिली आहे. खून केल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना या सर्व प्रकरणात अ‍ॅम्ब्युलन्सच्या चालकाची काय भूमिका होती? पोळ याने केलेल्या खुनाची कल्पना चालकाने डॉ. घोटवडेकर यांना दिली होती का? दिली असेल तर डॉ. घोटवडेकर यांनी काय केले आणि दिली नसेल तर का दिली नाही? कारण संतोष पोळ हा तर स्वत: अ‍ॅम्ब्युलन्स चालवत नव्हता. त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये नव्याने चौकशी होणार की कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
४प्रत्येक अ‍ॅम्ब्युलन्सचे एक रजिस्टर ठेवणे व त्यात सर्व नोंदी ठेवणे बंधनकारक असते. अ‍ॅम्ब्युलन्सला कर, टोलमाफी उगाच नाही. त्यामुळे घोटवडेकर यांच्या अ‍ॅम्ब्युलन्सचे रजिस्टर आहे का? त्यात साऱ्या नोंदी आहेत का? असतील तर त्या नोंदीच्या आधारे संतोष पोळ याचे कारणामे लक्षात आले नाहीत का? नोंदी नाहीत तर का नाहीत? सरकारने अ‍ॅम्ब्युलन्ससाठी दिलेल्या सवलती असे नियम डावलण्यासाठी दिल्या नाहीत.

घोटवडेकर उवाच...

डॉ. घोटवडेकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘१५ जुलै रोजी त्याने माझी अ‍ॅम्ब्युलन्स चोरून नेली. त्याबाबत मी लगेचच १६ जुलै रोजी पोलिस ठाण्यात अ‍ॅम्ब्युलन्स चोरीची फिर्याद दाखल केली. थेट त्याच्या नावाने पहिली एफआरआय मीच दाखल केली असून, त्यामुळेच पोलिसांनी संतोष पोळला पकडले आणि त्याचे हे भयानक कृत्य सामोरे आले.’
वास्तविक संतोष पोळ हा घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये रुजू होण्यापूर्वी धोम, वडवली परिसरात डॉक्टर म्हणूनच प्रॅक्टीस करत होता. तो बोगस डॉक्टर आहे, हे आता उघड सत्य आहे, असे असतानाही बोगस डॉक्टर म्हणून वावरणाऱ्या संतोष पोळला घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये कसा काय थारा दिला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यावर बोलताना डॉ. घोटवडेकर म्हणाले, ‘तो डॉक्टर नाही, हे मला माहितीच होते. त्यामुळे तो माझ्या इथे डॉक्टर म्हणून कार्यरत नव्हता आणि आयसीयूचा प्रमुखही नव्हता. मदतनीस म्हणूनच तो येथे कार्यरत होता. माझ्या येथून तो निघून गेल्यावर नंतरच्या काळात काय उद्योग करत होता, याची कल्पना नाही. त्याच्यावर ज्या कामांची जबाबदारी होती, ती कामे मात्र तो व्यवस्थित करत होता,’ असेही डॉ. घोटवडेकर यांनी सांगितले.
डॉ. घोटवडेकर आपली बाजू मांडताना संतोष पोळ याच्या विक्षिप्तपणाचा कधीच अनुभव आला नसल्याचे सांगतात तेव्हा मात्र आश्चर्य वाटते.
‘संतोष पोळ याने केलेल्या भयानक कृत्याने प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर ही घटना उघडकीस आल्यानंतर आणि त्यामुळे झालेल्या हॉस्पिटलच्या चर्चेमुळे रक्तदाबही वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. तो एवढी क्रूरकृत्य करू शकेल किंवा केली असतील, असे कधी वाटलेच नाही. तो माझ्या इथे कामाला होता, हे मान्यच करतोय; पण त्यामुळे मी कसा दोषी ठरतो?,’ असा उलट सवालच त्यांनी केला.
संतोष पोळ हा घोटवडेकर हॉस्पिटलचा कर्मचारी होता, बाहेर तो डॉक्टर म्हणून वावरत होता, असे असताना तुम्हाला जबाबदारी कशी झटकता येईल? या प्रश्नावर डॉ. घोटवडेकर म्हणाले, ‘माझी जबाबदारी हॉस्पिटलमध्ये होती. त्याने केलेल्या क्रूरकृत्याशी हॉस्पिटलशी कोणताही, कसलाही संबंध नाही किंवा त्याने केलेल्या खुनांचा घटनाक्रम व हकिकती समजून घेतल्या तर त्यामध्ये हॉस्पिटलचा काही संबंधही येत नाही.’

इतर डॉक्टरही त्याला डॉक्टरच म्हणायचे...
या सर्व प्रकाराने अनेक शंकास्पद बाबी समोर आल्या असून, घोटवडेकरांसोबत ग्रामीण भागातील इतरही काही डॉक्टर संतोष पोळला डॉक्टर म्हणून मान्यता देत व्यवहार करत होते. त्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. या सर्व प्रकरणाचे गौडबंगाल काय? वैद्यकीय क्षेत्राबाबतचा आदर आजही समाजात मोठ्या प्रमाणावर कायम आहे. संतोष पोळ या असंगाच्या संगावर प्रकाश पडणार की कसे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vichy doctor's rue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.