विद्यमान उपाध्यक्षांचा पत्ता होणार कट!

By Admin | Updated: January 23, 2015 00:35 IST2015-01-22T23:41:00+5:302015-01-23T00:35:56+5:30

जिल्हा बँक निवडणूक : ९७ व्या घटनादुरुस्तीमुळे संचालकांची संख्या २४ वरून २१ वर

The Vice President's address will be cut! | विद्यमान उपाध्यक्षांचा पत्ता होणार कट!

विद्यमान उपाध्यक्षांचा पत्ता होणार कट!

सागर गुजर- सातारा -जिल्ह्याच्या राजकारणाचा श्वास असणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २०१५-२० या वर्षासाठी संचालक मंडळ निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. मात्र, सहकारातील ९७ व्या घटनादुरुस्तीमुळे आर्थिक दुर्बल व व्यक्तिगत सभासद हे दोन मतदारसंघ रद्द झाल्याने विद्यमान उपाध्यक्ष रवींद्र कदम यांचा पत्ता कट झालेला आहे. तर व्यक्तिगत सभासद मतदारसंघातून निवडून आलेले काँगे्रसचे दादासाहेब गोडसे यांनाही दुसरी सोय पाहावी लागणार आहे.
येत्या मे महिन्यात जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक घेतली जाणार आहे. या बँकेतील सत्ता जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणावर परिणाम करणारी ठरत असते. सध्या बँकेवर राष्ट्रवादीच्या बहुमताची सत्ता आहे. निवडून आलेल्या २३ सभासदांपैकी २१ सभासद राष्ट्रवादीचे आहेत. साहजिकच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादीचाच वचक आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीनंतर संचालक मंडळाची संख्या घटविण्यात आलेली आहे. यामध्ये व्यक्तिगत सभासद व आर्थिक दुर्बल हे मतदारसंघ रद्द झाले आहेत. आर्थिक दुर्बल गटातून बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष रवींद्र कदम हे प्रतिनिधित्व करत आहेत. तर व्यक्तिगत सभासद गटातून दादासाहेब गोडसे हे प्रतिनिधीत्व करत आहेत. मतदारसंघ रद्द झाल्याने गैरसोय होणार आहे.
सध्या विकास सेवा सोसायटी मतदार संघातून विद्यमान चेअरमन लक्ष्मणराव पाटील (वाई), शशिकांत शिंदे (कोरेगाव), रामराजे नाईक-निंबाळकर (फलटण), विलासराव पाटील-उंडाळकर (कऱ्हाड), शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा-जावळी), विक्रमसिंह पाटणकर (पाटण), आमदार प्रभाकर घार्गे (खटाव), सदाशिवराव पोळ (माण), लालासाहेब शिंदे (कोरेगाव), दत्तात्रय ढमाळ (खंडाळा), राजेंद्र राजपुरे (महाबळेश्वर) हे प्रतिनिधीत्व करत आहेत. गृहनिर्माण ग्राहक पाणीपुरवठा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले, कृषी उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था गटातून दादाराजे खर्डेकर, औद्योगिक विणकर संस्थेतून अनिल देसाई, सहकारी खरेदी-विक्री संघातून विश्वासराव निंबाळकर, डेअरी सोसायट्यांतून शाहूराज फाळके, अनुसूचित जाती-जमातीतून प्रकाश बडेकर, इतर मागास प्रवर्गातून शिवाजीराव जमदाडे, भटक्या विमुक्त जमातीतून प्रा. अर्जुनराव खाडे, महिला प्रतिनिधी सुनेत्रा शिंदे, मंगल पवार या प्रतिनिधीत्व करत आहेत.
संचालक मंडळाच्या संख्या कमी झाली असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे सहकार खाते भाजपकडे असल्याने हा पक्षही या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावण्याची शक्यता आहे. काँगे्रस, शिवसेना हे पक्षही राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करतील, अशी परिस्थिती आहे.
दरम्यान, सहकार विभागाने मतदार यादीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. २१ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत संस्थांचे ठराव मागविण्यात आले आहेत. विभागीय सह निबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांची जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी बँकेच्या सदस्य संस्थांनी त्यांचे प्रतिनिधींचे ठराव संबंधित तालुका उपसहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात २१ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांनी दिली आहे.


निवडणूक राष्ट्रवादीसाठी कसरतीची...
नागरी बँका, पतसंस्था विभागातून दिवंगत विलासराव पाटील-वाठारकर हे प्रतिनिधीत्व करत होते. या जागेसाठी राष्ट्रवादी नवीन चेहरा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी अनेकांनी आतापासूनच फिल्डिंग लावलेली आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादीने मोठी ताकद लावून बँकेवर वर्चस्व मिळविले होते. यंदाची निवडणूक मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी कसरतीची ठरणार आहे.

Web Title: The Vice President's address will be cut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.