उपाध्यक्षांनी घेतला कोंडवेचा आढावा
By Admin | Updated: January 23, 2015 23:38 IST2015-01-23T20:26:16+5:302015-01-23T23:38:59+5:30
‘ग्राम संसद’ योजना : आगामी कामाचीही ठरली रणनीती--गाव बदलतंयगड्या

उपाध्यक्षांनी घेतला कोंडवेचा आढावा
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘ग्राम संसद’ योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या कोंडवे गावाने आजवर केलेल्या विकासकामांचा आढावा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी घेतला. यावेळी भविष्यात राबवायच्या विविध योजनांचीही रूपरेषा ठरविण्यात आली.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात गुरुवारी बैठक झाली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवी शिवदास यांच्यासह कोंडवे गावातील सरपंच शरद बोडके, उपसरपंच सचिन भुजबळ उपस्थित होते.
‘ग्राम संसद’ योजनेंतर्गत कोंडवे गाव दत्तक घेतल्यापासून कोंडवे ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला हाताशी धरून अनेक नवनवीन उपक्रम राबविले आहेत. याची माहिती यावेळी देण्यात आली. यामध्ये अनेक वर्षांपासूनचे अतिक्रमण काढण्यात आले. त्याचप्रमाणे स्मशानभूमीचा रस्ता समोपचारातून खुला करण्यात यश आले आहे. निर्मल गाव करण्याच्या दृष्टीने गावातून रंगरंगोटी केली असून, परिसरात श्रमदानातून स्वच्छता केली जाते. तसेच विविध घोषवाक्य तयार केलेले फलक लावण्यात आले आहेत.
कोंडवेच्या विकासासाठी काही कामे करावे लागणार आहेत. याविषयीही चर्चा करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, ग्रामपंचायतीच्या इमारतीला मंजुरी देणे, कालवे दुरुस्ती, बंधारे बांधण्यासंदर्भात चर्चा झाली. ग्रामपंचायत इमारतीला मंजुरी लवकरच देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
यावेळी बाळासाहेब चोरगे, मधुकर निंबाळकर, बाळासाहेब ननावरे, दिलीप निंबाळकर, सुभाष निंबाळकर, अधिकराव निंबाळकर, ग्रामसेवक एम. जी. माने उपस्थित होते. (प्रतिनिधी)