पशुवैद्यकीय पदवीधर पिकवतोय विदेशी भाज्या

By Admin | Updated: October 6, 2015 00:42 IST2015-10-05T21:50:09+5:302015-10-06T00:42:56+5:30

ही रानवाट वेगळी..

Veterinary graduates oversee foreign vegetables | पशुवैद्यकीय पदवीधर पिकवतोय विदेशी भाज्या

पशुवैद्यकीय पदवीधर पिकवतोय विदेशी भाज्या

पारंपरिक शेतीला बगल देऊन आधुनिक शेतीची कास धरत शेतीमध्ये यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा ऐकत आपणही आपल्या शेतीत काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीने पाचवड, ता. वाई येथील नितीन शेवाळे हा पदवीधर युवक शेती क्षेत्रामध्ये आला. सर्वसाधारण पंधरा वर्षांपूर्वी पशुवैद्यकीय पदवी घेऊनही शेतीमध्ये नशीब आजमवण्यासाठी झेपावलेला पाचवडमधील तो एकमेव पदवीधर शेतकरी. आंतरराष्ट्रीय भाज्यांचे उत्पादन घेऊन एक यशस्वी शेतकरी म्हणून पाचवड भागात प्रसिद्धीस आलेल्या या अवलियाची ही यशोगाथा...
आजूबाजूची पारंपरिक शेती बघत मोठा झालेला नितीनला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. शालेय शिक्षणानंतर पशुवैद्यकीय पदवी मिळविली. काहीकाळ पाचवड व आसपासच्या भागामध्ये पशुवैद्यक म्हणून काम सुरू केले. हे करत असताना वेगवेगळ्या विचारांच्या शेतकऱ्यांशी संबंध येत गेला. प्रत्येक शेतकरी शेतीविषयी आपली व्यथा मांडीत होता. शेतकऱ्यांच्या या व्यथांमागचे कारण नितीनच्या लक्षात आले. शेतकरी करत असलेला पारंपारिक शेती, बाजारपेठेतील माहितीची उणीव व शेतीमधील आधुनिकतेचा अभाव या कारणांचा शोध लागल्यावर नितीनने पशुवैद्यकाचे काम थांबविले. पशुवैद्यकीय कामे न करता आपण उच्च दर्जाची शेती करायची, हे मनाशी ठरवलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादित केल्या जाणाऱ्या भाज्या आपण आपल्या शेतामध्ये घेण्याचे नितीनने ठरवले.
पुणे येथील एका शेती कंपनीमध्ये काम करत असणाऱ्या बंधूचे मार्गदर्शन घेण्याचे ठरवून थेट पुणे गाठले. त्याठिकाणी ब्रोकोली, सॅलरी, चायना कॅबेज, लेटूस आईसबर्ग व अन्य काही आंतरराष्ट्रीय भाज्यांच्या लागवडी, संगोपन व बाजारपेठेविषयी सविस्तर माहिती घेतली. आपल्या गावाकडची जमीन या भाज्यांच्या लागवडीसाठी योग्य असल्याची माहिती घेतल्यानंतरच या भाज्यांचीच शेती करण्याचे नितीनने ठरवले. वाई तालुक्यातील पाचवड गावाचा शेतीचा भाग म्हणजे मोठा ऊसउत्पादक म्हणून ओळख आहे. अशा ठिकाणी या भाज्यांची लागवड करताना सुरुवातीला आपण चूक करतो की काय, अशी भावना नितीनच्या मनात आली होती. पाचवड विकाससेवा सोसायटीत कार्यरत असणारे नतीनचे बंधू आदिनाथ यांनी आधार दिला. बदल महत्वाचा हे पटल्यानंतर ‘ब्रोकोली’ भाजी लागवडीकरिता निवडली. नितीनची ही वाटचाल युवकांसाठी प्रेरणादायकच आहे.


महेंद्र गायकवाड

Web Title: Veterinary graduates oversee foreign vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.