पशूलाही लाजवतोय पशुवैद्यकीय दवाखाना!
By Admin | Updated: January 8, 2015 23:59 IST2015-01-08T23:05:50+5:302015-01-08T23:59:55+5:30
समस्यांचा विळखा : कातरखटाव येथील ५२ वर्षांच्या जुन्या इमारतीची दारे-खिडक्या गायब, सर्पांचा वावर

पशूलाही लाजवतोय पशुवैद्यकीय दवाखाना!
कातरखटाव : कातरखटाव, ता. खटाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना समस्यांच्या गर्तेत अडकला असून पशूलाही लाजवेल, अशी दुरवस्था झालेली आहे. ५२ वर्षांची जुनी इमारत धोकादायक बनल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.या इमारतीच्या पाया, भिंतीला भेगाळल्या आहेत. दारे, खिडक्या गायब असून कौले फुटलेली आहेत. भिंतीत पावसाचे पाणी मुरत असल्यामुळे सिमेंटचे प्लास्टर खराब झाले आहे. इमारतीला कंपाऊंड नसल्यामुळे कार्यालयाच्या परिसरात ग्रामस्थ शौचविधी करतात.ग्रामपंचायतीने नळ कनेक्शन तोडल्यामुळे वीस वर्षे झाली पाण्याची समस्या आहे. शौचालयाची सोय नाही. शेजारी बंधारा असल्यामुळे पावसाळ्यात कमरेएवढे गवत वाढते. त्यामुळे दवाखान्यात विषारी सापांचा वावर वाढला आहे. अनेकदा सकाळी दवाखाना उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांना सापाचे दर्शन होत असते. शासकीय इमारतीला पाणी पुरवठा मोफत असूनही ग्रामपंचायतीने नळ कनेक्शन तोडल्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे.संबंधित खात्याकडून गेली वीस वर्षे फक्त आश्वासने मिळत आहेत. कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे व सापांचा वावर असल्यामुळे भीतीपोटी अधिकारी किंवा कर्मचारी इथे रात्रीवेळी मुक्काम करीत नाहीत. डॉक्टरांना वैयक्तिक भाडोत्री खोली घेऊन राहावे लागत आहे. जनावरे घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मुक्काम डॉक्टर नसल्यामुळे त्रास होत आहे. सुविधांचा बोजवारा असल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने या इमारतीच्या दुरुस्तीचे लवकर काम मार्गी लावावे, अशी मागणी शेतकरी, अधिकाऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)
वीस गुंठे दवाखान्याच्या जागेत ग्रामपंचायतीने अतिक्रमणे करून गाळे बांधले आहेत. प्रशासनाने या इमारतीचा १२ वर्षांपूर्वी इस्टिमेट प्लॅन काढून नेला आहे; परंतु अजूनही साधी खिडकीही बसली नाही. इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
- डॉ. सी. टी. राऊत,
पशु वैद्यकीय अधिकारी