पहिल्याच दिवशी ग्रंथ खरेदीला उडाली झुंबड
By Admin | Updated: January 3, 2015 00:01 IST2015-01-02T22:30:05+5:302015-01-03T00:01:24+5:30
सातारा : सोळाव्या ग्रंथमहोत्सवाला दिमाखात प्रारंभ; रामदास फुटाणे, सुनील सूर्यवंशी यांची उपस्थिती

पहिल्याच दिवशी ग्रंथ खरेदीला उडाली झुंबड
सातारा : वाचनसंस्कृतीचा जागर करणाऱ्या सातारच्या १६ व्या ग्रंथ महोत्सवाचा शुक्रवारी जिल्हा परिषद मैदानावर दिमाखदार प्रारंभ झाला. भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ग्रंथ खरेदीसाठी वाचकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले.
या उद्घाटन सोहळ्यास डॉ. शिवाजीराव कदम यांच्यासह प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, माजी खासदार यशवंतराव गडाख, ब्रहन् महाराष्ट्र जागतिक मराठी अकादमीचे (अमेरिका) अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, इस्त्रायलमध्ये ‘मायबोली’ हे मराठी मासिक चालवणारे नोहा मसिन, सिडनीत मराठी रेडिओ स्टेशन चालवणारे पद्मश्री विजय जोशी, कॅनडातील नमिता दांडेकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, दूरदर्शनचे नितीन केळकर, साहित्यिक श्रीनिवास ठाणेदार, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अमित कदम, ग्रंथमहोत्सव समितीचे प्राचार्य यशवंत पाटणे, शंकर सारडा, शिरीष चिटणीस उपस्थित होते.
जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती व जागतिक मराठी अकादमीच्या संयुक्त विद्यमाने या गं्रथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महोत्सवाला यंदा प्रथमच जागतिक मराठी अकादमीचे पाठबळ मिळाल्यामुळे संयोजकांसह साहित्यप्रेमींचाही ऊर आनंदाने भरून आला आहे. वाचक ग्रंथांपर्यंत पोहोचत नसतील, तर ग्रंथांनी वाचकांपर्यत गेले पाहिजे, ही उदात्त भूमिका घेऊन सातारच्या भूमीत भव्य प्रमाणात साजरा होणारा गं्रथोत्सव तरुण पिढीला दिशा दाखवेल,’ असा आशावाद भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांनी उद्घाटनपर भाषणात व्यक्त केला. आपल्या ध्येयाच्या मार्गावर जिथे अडचणी येतात, तिथे अनेकदा पुस्तके मार्गदर्शक ठरत असतात. या पुस्तकांच्या माध्यमातून आपण उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा प्रकाशवाटा दाखविण्याचे काम पुस्तके करत असतात. म्हणूनच ग्रंथांना जीवनात महत्त्वाचे स्थान असायला हवे. मुलांना आत्मचरित्रे वाचायला दिली पाहिजेत. वाचनाची आवड त्यांच्यात त्याच वयात निर्माण केली पाहिजे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
साताऱ्यात गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती जपण्याचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे उद्गार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी काढले. ‘आपली माती, आपली भाषा, संस्कृती याकडे आपण लक्ष दिले नाही, तर उद्या आपली मुले त्याकडे पाठ फिरवतील. त्यामुळे अशा उपक्रमांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन निश्चितपणे अशा उपक्रमांना सहकार्य करेल,’ असे अभिवचन त्यांनी दिले. याप्रसंगी रामदास फुटाणे, प्राचार्य यशवंत पाटणे, यांचीही भाषणे झाली. (प्रतिनिधी)
सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवानिमित्त सातारा शहरात भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. शहरातील विविध रस्त्यावरून ही दिंडी गेली. या ग्रंथदिंडीत विविध शाळांचे चित्ररथ, वाद्यवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी व साहित्य रसिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळपासूनच सातारा शहरात ग्रंथ महोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. सातारकर नागरिकांसह शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या ग्रंथ दिंडीत उत्स्फूर्त असा सहभाग घेतला. त्यामुळे ग्रंथ दिंडी यशस्वी ठरली.