वेण्णा लेकचे पाणी हिरवे!
By Admin | Updated: June 30, 2014 00:30 IST2014-06-30T00:26:25+5:302014-06-30T00:30:20+5:30
पाऊस लांबला : शेवाळ, प्रदूषके वाहून जाण्याचा मार्ग बंद

वेण्णा लेकचे पाणी हिरवे!
महाबळेश्वर : बोटिंगसाठी प्रसिद्ध असलेला महाबळेश्वरचा वेण्णा लेक वेगळ्याच कारणाने प्रकाशात आला आहे. या तलावाचे पाणी हिरवे झाले असून, ते पाहण्यासाठी गर्दी होत आहे. पाऊस लांबल्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहिले नाही. तसेच शेवाळ, प्रदूषके वाहून जाण्यास मार्ग राहिला नाही, त्यामुळे हे घडले आहे.
महाबळेश्वर गिरिस्थान पालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या वेण्णा लेकचे पाणी महाबळेश्वर आणि पाचगणी शहरांमध्ये पिण्यासाठीही वापरले जाते. वेण्णा नदीचा हा उगमस्रोत आहे. दरवर्षी जूनअखेरीस या तलावाचे पाणी सांडव्यावरून वाहू लागते. त्याबरोबरच शेवाळ आणि प्लास्टिक कचराही वाहून जातो. यावर्षी पाऊस लांबल्याने अजून सांडव्यापर्यंत पोहोचू शकले नाही. तसेच शेवाळ वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने पाण्याचा रंग हिरवा झाला असून, पाणी फेसाळ दिसत आहे.
स्थानिक व्यावसायिकांना विचारले असता, काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरमध्ये थोडाफार पाऊस झाला होता. नंतर पाऊस नसल्यामुळे शेवाळाला अनुकूल वातावरण मिळाले असल्यामुळे शेवाळ वाढले. त्यामुळे पाणी हिरवे आणि फेसाळ दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेकडून काही दिवसांपूर्वीच नदीच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी पाणी प्रयोगशाळेत पाठविले आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली. पालिकेतर्फे शहरात पिण्याच्या पाण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)