वेंगुर्लेत स्वच्छता अभियान राबविणार

By Admin | Updated: November 28, 2014 00:10 IST2014-11-27T22:28:46+5:302014-11-28T00:10:54+5:30

प्रसन्ना कुबल : २ डिसेंबरपासून कार्यक्रम; नागरिकांनी सहभाग घ्यावा

Vengurleet cleanliness campaign will be implemented | वेंगुर्लेत स्वच्छता अभियान राबविणार

वेंगुर्लेत स्वच्छता अभियान राबविणार

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरी स्वच्छ - सुंदर बनविण्यासाठी शहरातील नागरिक, व्यापारी, विविध संस्था, मंडळे, शाळा, कॉलेज, वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर राजकीय पक्षांचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, रिक्षा संघटना, मत्स्य व्यावसायिक, भाजी व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले नगर परिषदेच्या हॉलमध्ये वेंगुर्ले नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी आयोजित केलेल्या सभेत २ ते १० डिसेंबर या कालावधीत ‘वेंगुर्ले स्वच्छ वेंगुर्ले सुंदर’ हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर परिसराच्या स्वच्छतेतून करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
वेंगुर्ले शहर सदोदीत स्वच्छ आणि सुंदर रहावे, या उद्देशाने वेंगुर्ले नगराध्यक्ष प्रसन्न कुबल यांनी नगरातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन ‘स्वच्छता अभियान’ राबविण्याकरिता आयोजित केलेली सभा वेंगुर्ले नगर परिषदेच्या सभागृहात कुबल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, निवासी नायब तहसीलदार एन. बी. कांदळकरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, नगरसेवक रमण वायंगणकर, दाजी परब, नगरसेविका अ‍ॅड. सुषमा प्रभूखानोलकर, चेतना केळूसकर, अन्नपूर्णा नार्वेकर, नगर परिषद प्रमुख लिपिक हनिफ म्हाळुंगकर यांचा समावेश होता.
सभेत स्वच्छतेबाबत वेंगुर्ले नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले, व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष भाई मोरजे, बिल्डर असोसिएशनचे पदाधिकारी राजन गिरप, व्यापारी विजय पांगम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, होमोओपॅथीक कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. जी. केळकर, बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. वामन गावडे, रा. कृ. पाटकर हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक एटले, डॉ. संजीव लिंगवत, वैश्यवाणी समाज मंडळाचे पदाधिकारी सतीश डुबळे, हॉटेल व्यावसायिक गणेश नार्वेकर, जयंत बोवलेकर, भाजपाचे शहर अध्यक्ष संजय तानावडे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा स्रेहा कुबल, शिवसेनेच्या महिला शहराध्यक्षा निशा नाईक, बॅ. खर्डेकर महाविद्यालय संस्थेचे प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, वेंगुर्ले हायस्कूलचे शिक्षक जयराम वायंगणकर, सामाजिक कार्यकर्ते बबन नार्वेकर, पोलीस पाटील शरद जाधव, वकील संघटनेतील अ‍ॅड. शुभांगी सडवेलकर यांनी संकल्पना मांडल्या.
वेंगुर्ले स्वच्छ व सुंदर नेहमीच रहावी. स्वच्छतेतील सुंदर व स्वच्छ वेंगुर्ले नगरी सर्वांना स्वच्छतेचे विकास मॉडेल ठरून अन्य गाव व शहरे यामधील लोकप्रतिनिधी व नागरिक वेंगुर्ले शहर पहावयास यावेत, अशी स्वच्छता प्रत्येक घराघरातून, गृहनिर्माण सहकारी संस्था, हॉटेल्स, दुकाने, मच्छिमार्केट, भाजी मार्केट, भाजी मार्केटमधील नागरिक व व्यापाऱ्यांनी, तसेच नगरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वच्छता ठेवून सहकार्य करावे. रस्त्यालगत असलेल्या कुंपणाच्या ठिकाणची झाडी, साईडपट्टी व रस्त्यावर आलेली असल्यास संबंधित मालकांनी ती तोडून घेऊन वेंगुर्ले नगरी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत व २ ते १० डिसेंबर या कालावधीत वेंगुर्ले नगरात सर्व नगरसेवकांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानात शहरातील प्रत्येक नागरिकाने सहभाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vengurleet cleanliness campaign will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.