पाचवड उड्डाणपूलावरून धावली वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:28 IST2017-07-18T23:05:16+5:302017-07-18T23:28:56+5:30
पाचवड उड्डाणपूलावरून धावली वाहने

पाचवड उड्डाणपूलावरून धावली वाहने
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचवड : जिल्हाधिकारी श्वेता सिंंघल यांच्या आदेशावरून महावितरणने आपल्या देखरेखीखाली आयटीडीच्या एजन्सीमार्फत उड्डाणपूलावरील वाहतूकीस अडथळा ठरलेली हायटेन्शन लाईन काढून घेतली. त्यानंतर आयटीडीने मंगळवार, दि. १८ रोजी सकाळपासून पाचवडच्या उड्डाणपूलावरून सातारहून पुण्याकडे जाणारा मार्ग वाहतूकीसाठी खुला करून वाहतूक सुरू केली.‘लोकमत’ने पाचवडचा उड्डाणपूल वाहतूकीसाठी सज्ज या मथळ्याखाली रविवारी याबाबत सविस्तर वृत्त दिले होते. त्यानंतर दोन दिवसातच उड्डाणपूलावरून वाहतुक सुरू झाली.
आनेवाडी, उडतरे, सुरूर व जोशी विहीर येथील उड्डाणपूलांची कामे पूर्ण झाल्यानंतर भुर्इंज व पाचवडच्या उड्डाणपूलांची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र ही कामे सुरू असतानाच भुर्इंज येथील किसनवीर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल कोसळला तर पाचवड येथील उड्डाणपूलाला भगदाड पडले त्यामुळे या दोन्ही उड्डाणपूलांच्या कामाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांबरोबरच स्थानिकांनीही अनेकदा याबाबत आवाज उठविला होता. या सर्व प्रकारानंतर एकेरी वाहतूक सुरू असलेल्या भुर्इंजच्या उड्डाणपूलाच्या दोन्ही वाहतूकीसाठी खुल्या झाल्या. मात्र पाचवडच्या उड्डाणपूलावरून महावितरणची हायटेन्शन लाईन गेल्याने काम पूर्ण होऊनही तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता.
महामार्गांच्या अशाप्रकारच्या सर्व अडथळ्यांबाबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी न्हाई, रिलायन्स व आयटीडीचे अधिकारी तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरून महावितरणने आयटीडीने नव्याने नेमलेल्या एजन्सीकडून शनिवारी दुपारी पाचवड उड्डाणपूलावरून वाहतूकीस अडथळा ठरणारी महावितरणची हायटेन्शन लाईन काढून घेऊन वाहतूकीचा अडथळा दूर केला. त्यानंतर मंगळवारी सकाळी उड्डाणपूलावरून सातारकडून पुणेकडे जाणाऱ्या लेनवरून प्रथम वाहतूक सुरू केली.