कॉलेजच्या रस्त्यावर वाहने सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:26+5:302021-07-20T04:26:26+5:30

कऱ्हाड : विद्येचे माहेरघर असलेल्या विद्यानगर परिसरात लहान-मोठी अनेक महाविद्यालये असल्याने या ठिकाणी कायमच गर्दी असते. त्यामुळेच रस्ते विकास ...

Vehicles on the college road | कॉलेजच्या रस्त्यावर वाहने सुसाट

कॉलेजच्या रस्त्यावर वाहने सुसाट

कऱ्हाड : विद्येचे माहेरघर असलेल्या विद्यानगर परिसरात लहान-मोठी अनेक महाविद्यालये असल्याने या ठिकाणी कायमच गर्दी असते. त्यामुळेच रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून कृष्णा कॅनॉल ते बनवडी फाट्यापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, रस्ता चौपदरी करताना गतिरोधक उभारले गेले नाहीत. दोन ठिकाणी केवळ रम्बलर करून, वाहनांचा वेग कमी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, चालक रम्बलरला जुमानत नसल्याचे चित्र असून, भरधाव वाहनांमुळे अपघात घडत आहेत.

कऱ्हाड ते मसूर रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. या रस्त्यावरच विद्येचे माहेरघर समजला जाणारा विद्यानगर परिसर असून, येथे वेगवेगळ्या शाखांचे शिक्षण देणारी अनेक महाविद्यालये आहेत, तसेच रहिवासी संकुल असल्याने दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. रस्ता चौपदरी आणि चकाचक झाला, पण रस्त्यावर कोठेही गतिरोधक तयार करण्यात आले नाहीत. परिणामी, वाहनांचा वाढता वेग अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. अनेक युवक या रस्त्यावरून धूम स्टाईलने दुचाकी चालवतात, तसेच ‘ट्रिपल सीट’ रपेटही मारतात. या धूम स्टाईलवेळी दुचाकीच्या आवाजाने अनेकांना धडकी भरते. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकातून छेदरस्ते ठेवण्यात आले आहेत. अंतर्गत रस्त्यावर जाण्यासाठीही जोडरस्ते आहेत. त्यामुळे वळण घेणारी वाहने अचानक गती कमी करतात. परिणामी, अपघाताची शक्यता निर्माण होते. या मार्गावर आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गतिरोधक निर्माण करणे आवश्यक आहे.

- चौकट

रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य

कृष्णा कॅनॉल ते बनवडी फाट्यापर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. रस्त्यात दुभाजकही उभारण्यात आले. मात्र, या मार्गावर एकही पथदिवा नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा रस्ता पूर्णपणे अंधारात असतो.

- चौकट

रस्त्यात काही ठिकाणी पथदिवे आहेत. मात्र, ते जुन्या पद्धतीचे आहेत. त्याचा उजेड खांबापुरताच मर्यादित असतो. रात्रीच्या वेळी अनेक जण या रस्त्यावर फिरण्यासाठी येतात, तसेच मॉर्निंग वॉकसाठीही गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर पथदिवे बसविणे गरजेचे आहे.

... येथे असावेत गतिरोधक!

१) कृष्णा कॅनॉल चौक

२) स्टर्लिंग जीमसमोरचे वळण

३) गाडगे महाराज महाविद्यालय

४) साई गार्डन रेस्टॉरंटसमोर

५) फार्मसी महाविद्यालय

६) वेणूताई चव्हाण महाविद्यालय

७) अभियांत्रिकी महाविद्यालय

८) बनवडी फाटा चौक

फोटो : १९केआरडी०५

कॅप्शन : कऱ्हाडातील कृष्णा कॅनॉल ते बनवडी फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे वाहने सुसाट असतात.

Web Title: Vehicles on the college road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.