पोवई नाक्यावर भाजीविक्रेती ठार
By Admin | Updated: June 25, 2014 00:29 IST2014-06-25T00:23:30+5:302014-06-25T00:29:21+5:30
दीर जखमी : ट्रकची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक

पोवई नाक्यावर भाजीविक्रेती ठार
सातारा : येथील पोवई नाक्यावर ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला, तर युवक जखमी झाला. सोनाली जरग असे मृत भाजी विक्रेती महिलेचे नाव असून, त्यांचा दीर अरुण जरग हा किरकोळ जखमी झाला. हा अपघात आज, मंगळवारी सकाळच्या सुुमारास घडला. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास अरुण संतू जरग (वय २६) आणि सोनाली तानाजी जरग (२७, दोघेही रा. समर्थ कॉलनी, देगाव फाटा सातारा) हे दीर-भावजय दुचाकी (एमएच ११ बीबी ३५८७) वरून मंडईतून देगावफाट्याकडे चालले होते.
येथील पोवई नाक्याजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या ट्रक (एमएच ११ एएल ५५५) ने जोराची धडक दिली. या धडकेमुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. यामध्ये सोनाली जरग या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर अरुण जरग हे किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)