भाजीपाला आवक वाढली;पण दर गडगडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST2021-04-20T04:40:18+5:302021-04-20T04:40:18+5:30
प्रमोद सुकरे कराड : सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वांना धडकी भरवत आहे.‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारने ...

भाजीपाला आवक वाढली;पण दर गडगडले!
प्रमोद सुकरे
कराड : सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वांना धडकी भरवत आहे.‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारने कडक संचारबंदी लावली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. भाजीपाला बाजारही बंद आहेत. त्यामुळे कराड शेती उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आवक वाढलेली असताना खरेदीदार मात्र कमी आहेत. परिणामी भाजीपाल्यांचे दर गडगडले आहेत. शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कराडची बाजारपेठ मध्यवर्ती बाजारपेठ मानली जाते. भाजीपाल्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रोज लाखोंच्या भाजीपाल्याची विक्री होते. कराडसह सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, कडेगाव, खानापूर येथील व्यापारी भाजीपाला खरेदीला येथे येतात. तसेच कर्नाटकातील बेळगावला; रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातल्या परिसरातही कराडच्या बाजार समितीतून भाजीपाला मोठ्या प्रमाणावर खरेदी केला जातो.
कोरोनामुळे मात्र सध्या बाजारपेठा बंद अवस्थेत आहेत. शहरातील भाजी मंडई, गावोगावचे आठवडा बाजार बंद झाले आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करून तो विकायचा कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी व्यापारीवर्ग खरेदीला अत्यल्प प्रमाणात आहे. याउलट स्वतः बाजारात भाजीपाला विकणारा शेतकरी बाजार बंद असल्याने तो बाजार समितीतच होलसेल दराने भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे येथील आवकही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
सोमवारी कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक खूपच झाली होती. पण तुलनेने खरेदीदार व्यापारी कमी असल्याने बराच माल पडून राहिला आहे. जो किरकोळ माल विकला गेला तो अत्यंत कमी दरात विकला गेला आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. घातलेला खर्चही त्यांच्या पदरात पडताना दिसत नाही. त्यामुळे तो हतबल झाला आहे.
मालाचा उठाव होत नसल्याने बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना माल घेऊन येऊ नका अशा सूचना दिलेल्या आहेत. आता हा माल कुठे विकायचा? हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याला पडला आहे. त्यामुळे तो बाजार समितीतच माल घेऊन येताना दिसत आहे; मात्र आपल्याला योग्य दर मिळत नसल्याने, कवडीमोल दराने भाजीपाला विकला जात असल्याने त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येताना दिसत आहे.
चौकट
भाजीपाला होलसेल दर
(आजचे व पूर्वीचे )
* वांगी - ५ रुपये किलो; २५ रुपये किलो
* भेंडी - २0 रुपये किलो; ४५ रुपये किलो
* टोमॅटो - ७. ५0 रुपये किलो; २0 रुपये किलो
* फ्लाॅवर- १.५0 रुपये किलो, १८ रुपये किलो
* कोबी -१.७५ रुपये किलो, १५ रुपये किलो
* आले- १0 रुपये किलो; ४0 रुपये किलो
कोट
कराड शेती उत्पन्न बाजार समितीत कराडसह खटाव, कोरेगाव येथून भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो; मात्र सध्या आठवडा बाजार बंद आहेत. जिल्हा बाहेर माल जात नाही. कोकणातही सर्व बंद आहे. त्यामुळे भाजीपाल्याला उठाव नाही. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे.
महादेव देसाई
सभापती; शेती उत्पन्न बाजार समिती, कराड.