भाजी.. किराणा अन् फास्टफूडही...!
By Admin | Updated: January 2, 2015 23:59 IST2015-01-02T21:10:02+5:302015-01-02T23:59:06+5:30
शिवाजी शाळा : विद्यार्थ्यांनी भरविला आठवडा बाजार; व्यवहार ज्ञान देण्यासाठी उपक्रम

भाजी.. किराणा अन् फास्टफूडही...!
वडूज : शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, यासाठी येथील शिवाजी प्राथमिक शाळेत आठवडा बाजाराचे नियोजन केले होते. यात भाजी, किराणा याबरोबरच फास्ट फूडचा स्टॉल विद्यार्थ्यांनी लावला.
येथील छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाच्या शिवाजी प्राथमिक शाळेत आठवडे बाजाराचे नियोजन केले. याचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्या हस्ते झाले. यावेळी विस्तार अधिकारी सोनाली विभूते, मुख्याध्यापिका शुभांगी देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नायकवडी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावरच व्यवहार ज्ञान मिळणे आवश्यक असते. या आदर्श उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील व्यवहार ज्ञानाचा स्वानुभव मिळण्यास एक प्रकारे मदतच होणार आहे, अशा उपक्रमामुळे पुस्तकी ज्ञानोबरोबरीने व्यवहार ज्ञानाची भर बाल वयात पडल्याने मुलांच्यात एक वेगळा उत्साह निर्माण होत आहे.’
दरम्यान, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल उभारले होते. तर यामध्ये भाजीपाला, फळभाज्या, किराणा स्टॉल व फास्ट फूडचे स्टॉलही मांडण्यात आले होते. या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह दाखवण्याजोगा होता. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या आठवडे बाजारला याप्रसंगी मुख्याध्यापिका शुभांगी देशमुख यांनी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी प्राथमिक शाळेत अशा पद्धतीचे अनेक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक एस. जे. शिंदे, एस. एस. इंगळे, के. ए. गोडसे आदींनी विशेष परिश्रम
घेतले. (प्रतिनिधी)
घरात प्रत्येक गोष्ट हातात आणून द्यायला लागणाऱ्या आपल्या लहानग्यांना भाजी विक्री करताना पाहण्यात खुपच आनंद मिळाला. त्यामुळे पालकांनी भरभरून खरेदी केली.