वीर धरणग्रस्तांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:03+5:302021-09-07T04:47:03+5:30
शिरवळ: ‘वीर धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित असणारे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, आगामी काळात लवकर खंडाळा तालुक्यातील वीर ...

वीर धरणग्रस्तांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार
शिरवळ: ‘वीर धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित असणारे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, आगामी काळात लवकर खंडाळा तालुक्यातील वीर धरणग्रस्त शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी राज्य शासनाच्या पातळीवर सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येईल,’ असे प्रतिपादन विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
शिरवळ येथे वीर धरणग्रस्त पुनर्वसन संघर्ष समितीचे पदाधिकारी व धरणग्रस्त शेतकरी यांनी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांची भेट घेतली व निवेदन देऊन चर्चा केली.
यावेळी राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय ऊर्फ बंडू ढमाळ, वीर धरण समिती समन्वयक डॉ. विजय शिंदे, अध्यक्ष देवानंद चव्हाण, सचिव अजिंक्य चव्हाण, उपसरपंच महेश चव्हाण, ॲड. नारायण चव्हाण, अंतोबा पाटील, अनंतराव चव्हाण, हरिश्चंद्र लिमण, अनिकेत चौधरी व धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
यावेळी वीर धरणग्रस्त शेतकऱ्यांनी इतर प्रकल्पांचे पुनर्वसन खंडाळा तालुक्यात होत असताना तालुक्यातील प्रकल्पांच्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन मात्र मंगळवेढा, पंढरपूर अशा दूरच्या, भौगोलिकदॄष्ट्या अडचणीच्या व असुरक्षित तालुक्यात करण्यात येत आहे. गेल्या ६० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही पुनर्वसन प्रलंबित आहे व अशा अनेक अडचणी येत खंडाळा तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे समिती पदाधिकाऱ्यांनी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर हा अन्याय दूर करण्याची ग्वाही रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली आहे. यासंदर्भाने दि. १५ सप्टेंबरनंतर संबंधित खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांच्या समवेत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी माहीती समिती समन्वयक डॉ. विजय शिंदे यांनी दिली.
०६शिरवळ
शिरवळ येथे विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना धरणग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती सांगताना वीर धरणग्रस्त शेतकरी.
(छाया : मुराद पटेल, शिरवळ)