एक हजार वर्षांपूर्वीची पाणपोई ढासळण्याच्या मार्गावर प्राचीन महामार्गावरील वास्तू : शिरवळमधील ऐतिहासिक ठेवा मोजतोय अखेरची घटका; इतिहासप्रेमींमधून नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:07 IST2018-01-10T00:06:41+5:302018-01-10T00:07:35+5:30
सातारा / शिरवळ : पुण्याहून साताºयाला येताना निरानदी ओलांडली की साताºयाची हद्द सुरू होते. तिथून पुढे उजव्या बाजूला नायगाव फाट्यावर मोडकळीस आलेल्या मंदिरासारखी वास्तू दिसते.

एक हजार वर्षांपूर्वीची पाणपोई ढासळण्याच्या मार्गावर प्राचीन महामार्गावरील वास्तू : शिरवळमधील ऐतिहासिक ठेवा मोजतोय अखेरची घटका; इतिहासप्रेमींमधून नाराजी
सातारा / शिरवळ : पुण्याहून साताºयाला येताना निरानदी ओलांडली की साताºयाची हद्द सुरू होते. तिथून पुढे उजव्या बाजूला नायगाव फाट्यावर मोडकळीस आलेल्या मंदिरासारखी वास्तू दिसते. दुर्दैवाने ते मंदिर नसून ती पाणपोई आहे. पाषाणात कोरेलेली ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षे जुनी असून, संवर्धनाअभावी ढासळण्याच्या मार्गावर आली आहे.
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, आजही अनेक पुरातन वास्तू, मंदिरे, शिल्प इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
त्यापैकी एक असलेली शिरवळजवळील पाषाणात कोरलेली पाणपोई. ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षांपूर्वी ‘जकात पिव्हई’ म्हणजे जकात नाक्यावर केलेली असावी. अखंड पाषाणात कोरलेले दोन खांब, त्यामागे घडवलेले मोठे पाषाण एकमेकांवर रचून खोली तयार केली आहे. छतही एकमेकांवर दगडी रचून तयार करण्यात आले आहे. आतमध्ये जमिनीशी समतल दोन रांजण असून ते दगडी आहेत. हे सारे बांधकाम ‘शुषकसांधा’ पद्धतीचे म्हणजे कोणतेही चुना वा सिमेंट सारखे पदार्थ न वापरता करण्यात आले आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरणाला या पुरातन वास्तूचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करताना या पाणपोईच्या भोवतालीच खोदकाम करून रस्ता तयार करण्यात आला आहे. या खोदकामामुळे पाणपोईची दगडी ढासळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. तब्बल एक हजार वर्षांहून अधिक काळ इतिहासाची साक्ष देत उभ्या असलेल्या या पाणपोईचे पुरातत्व विभागाच्या वतीने जतन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
दगडी झाल्या सैल...
पुरातन पाणपोई कोणत्याही प्रकारचा चुना अथवा सिमेंटसारखे पदार्थ न वापरता केवळ गुरुत्वबल वापरून उभारण्यात आली आहे. त्यातील एखादा दगड जरी पडला तरी ही वास्तू पुन्हा आहे तशी उभारणे अवघड आहे. या पाणपोईच्या दगडी एकमेकांपासून वेगळ्या होण्यास सुरुवात झाली आहे.
धर्मशाळा बांधणे, पाणपोया उभारणे या संकल्पना कालबाह्य होत चालल्या आहे; पण मानवतावादी, सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाºया वास्तू वाचविल्या पाहिजेत. त्यामुळे पुढच्या पिढीला किमान त्याची तोंडओळख तरी होईल.
- नीलेश पंडित,
कार्याध्यक्ष, जिज्ञासा इतिहास संशोधन संस्था