देवापूरच्या ग्रामसेवकास दमदाटी करून मारहाण
By Admin | Updated: June 26, 2016 00:35 IST2016-06-26T00:23:43+5:302016-06-26T00:35:09+5:30
कागदपत्रेही फाडली : सूर्यकांत खुळे यांची पोलिसांत तक्रार

देवापूरच्या ग्रामसेवकास दमदाटी करून मारहाण
म्हसवड : देवापूर, ता. माण येथील ग्रामसेवकाला एकाने गावामध्ये नीट काम करायचे, मगरुरी करायची नाही, असे धमकावत शिवीगाळ व हाताने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, देवापूर, ता. माण येथील ग्रामसेवक सूर्यकांत रघुनाथ खुळे ( वय ३९, रा. म्हसवड ) शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कामकाज करत बसले होते. त्यादरम्यान अप्पासो भीमराव पोळ (रा. देवापूर, ता. माण) हे तेथे आले व त्यांनी त्यांचे नातेवाईक सृष्टी विजय पवार यांचा जन्माचा दाखला मागितला. त्यानंतर त्यांना जन्माचा दाखला दिला गेला. त्यानंतर ते बराच वेळ ग्रामपंचायत कार्यालयातच बसून होते. त्यानंतर ते ‘तुम्ही गावामध्ये नीट काम करायचे, मगरुरी करायची नाही,’ असे धमकावत शिवीगाळ केले. त्यानंतर ‘शिवीगाळ करू नका,’ असे म्हणताच अप्पा पोळ यांनी उठून हाताला धरून मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत ग्रामपंचायतमधील शासकीय अपंग रजिस्टरमधील अपंगाचे दाखले फाडून टाकले व इतर शासकीय कागदपत्रे फाडून टाकून शासकीय रजिस्टरचे, दाखल्याचे इतर कागदपत्रांचे नुकसान केले. याबबत सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद दिली.
या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण, बी. आर. साबळे करीत आहेत. (प्रतिनिधी)