तुटलेल्या पुलावरून होतेय वर्दळ
By Admin | Updated: December 2, 2014 21:27 IST2014-12-02T21:08:34+5:302014-12-02T21:27:29+5:30
जीवितास धोका : तारळे-तोंडोशी साकव पुलाला समस्यांचे ग्रहण

तुटलेल्या पुलावरून होतेय वर्दळ
तारळे : तोंडोशी, ता. पाटण येथील साकव पुलाची दुरवस्था झाली असून त्यामुळे ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या पुलावरील लाकडी फळ्या पूर्णपणे निसटल्या असून पूलावरून ये-जा करणे धोकादायक झाले आहे़ ग्रामस्थांनी अनेकवेळा मागणी करूनही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे़
तारळे भागातील मुरूड प्रकल्प परिसरात असलेल्या मुरूड-तोंडोशी यादरम्यानचा साकव पूल पूर्णपणे मोडकळीस आला आहे़ पुलाच्या पलीकडे डफळवाडी, केंजळवाडी, कळंबे, तोंडोशी नवीन गावठाण या गावातील सुमारे दोन हजार लोकसंख्या असून, या ठिकाणाहून मुरूडला येण्यासाठी या साकव पुलामुळे सुमारे दीड किलोमीटर अंतराची बचत होण्याबरोबरच प्रवासखर्चातही बचत होत आहे़ या पुलावरून मुरूडला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच वयोवृध्दांसह बाहेरगावाहून आलेले नगरिक ये-जा करीत असतात़ मुरूड येथे राष्ट्रीयीकृत बँक, सोसायटी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर सोयीसुविधा असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच गावकऱ्यांची वर्दळ सुरू असते़
गेल्या दोन दिवसांपासून मात्र फळ्या तुटण्याचे ग्रहण पुलाला लागल्याने तेथील वाहतूक खूपच धोकादायक झाली आहे़ या पुलावरून ये-जा करणारे गावकरी पुलावर असणाऱ्या फळ्यांची किरकोळ दुरूस्ती करून त्याच धोकादायक पुलावरून प्रवास करीत आहेत़ अनेकवेळा शाळकरी मुले या फळीवरून त्या फळीवर उड्या मारत जात असल्याचे चित्र आहे़ यामुळे त्यांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
सुदैवाने मुलगा बचावला
या पुलावरून गेल्यावर्षी एक अपंग शाळकरी मुलगा तुटलेल्या फळ्यामधून सुमारे २० फूट खाली पडला होता; पण सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही़ काही दिवसांपूर्वी एक नागरिक या पुलाच्या फळ्यांमध्ये आडकला होता़ दररोज पुलावरून ये-जा करणारी शाळकरी मुले घरी येईपर्यंत पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो़