उसाच्या ट्रॉलीला व्हॅनची धडक; चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST2021-03-09T04:42:27+5:302021-03-09T04:42:27+5:30
कुडाळ : पाचवड-कुडाळ रस्त्यावर कुडाळ पोलीस ठाण्यापासून जवळच उभ्या असणाऱ्या उसाच्या ट्रॉलीला व्हॅनची धडक बसली. हा अपघात रविवारी ...

उसाच्या ट्रॉलीला व्हॅनची धडक; चार जखमी
कुडाळ : पाचवड-कुडाळ रस्त्यावर कुडाळ पोलीस ठाण्यापासून जवळच उभ्या असणाऱ्या उसाच्या ट्रॉलीला व्हॅनची धडक बसली. हा अपघात रविवारी पहाटे झाला. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत.
कुडाळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की, मेढा येथील भाजीपाला व्यापारी आनंद ढेबे हे होलसेल भाजीपाला आणण्यासाठी व्हॅन (एमएच ०८ आर ०९४०) मधून रविवारी पहाटे वाईकडे निघाले होते. कुडाळ पोलीस ठाण्यापासून जवळ रस्त्याच्या कडेला पहाटे चार वाजता उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला पाठीमागून व्हॅनची जोरदार धडक बसली. यामध्ये गाडीतील चार जण गंभीर जखमी झाले. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एस. आर. ओव्हाळ, कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. ही धडक एवढी जोरदार होती की या धडकेच्या आवाजाने तसेच गाडीतील लोकांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. जखमींना उपचारासाठी तत्काळ सातारा येथे हलवण्यात आले.
फोटो
०८कुडाळ-ॲक्सिडेंट
कुडाळ येथे सोमवारी पहाटे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला व्हॅनची धडक बसली. यात चार जण जखमी झाले. (छाया : विशाल जमदाडे)