‘सिद्धेश्वरी’नं राखला ‘लक्ष्मी’चा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:34 IST2018-04-12T23:34:52+5:302018-04-12T23:34:52+5:30

‘सिद्धेश्वरी’नं राखला ‘लक्ष्मी’चा मान
केशव जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेगाव : मान ओवाळण्याची खोड असलेल्या गायीविषयी समाजात अनेक समज गैरसमज आहेत. याच गैरसमजातून अज्ञाताने सोडून दिलेली गाय मरणासन्न अवस्थेत खटाव तालुक्यातील कातळगेवाडी येथील लक्ष्मी भारती यांना दिसली. भूतदयेच्या भावनेतून त्यांनी गायीला घरी आणून तिची सुश्रृषा केली आणि बघता बघता मान ओवाळणाऱ्या या गायीने लक्ष्मी भारती यांच्या घराला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले.
खटाव तालुक्यातील निढळ पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले कातळगेवाडी अत्यंत लहान गाव. याच गावातील लक्ष्मी भारती एके दिवशी सकाळी फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी गावाच्या जवळच असलेल्या डोंगरात त्यांना गायीची लहान कालवड जखमी अवस्थेत पडलेली दिसली. घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला त्या कालवडीला घरी आणण्याची विनंती केली. एक, दोन दिवसानंतर त्यांच्या लक्षात आले की या कालवडीला मान ओवाळण्याची खोड आहे. गावातील बºयाच जणांनी असले जनावर दावणीला नसावे, असे सल्ले दिले. उत्तम निगा राखत कालवडीची गायी झाली. ही गाय वाढत असतानाच लक्ष्मी यांचा संसारही समृद्धतेने बहरू लागला. हे सर्व गायीची सेवा केल्याचे फलित असल्याची भावना लक्ष्मी भारती यांची झाली. गायीच्या प्रेमाखातर त्यांनी गोठ्यात सात दिवस पारायण, सत्यनारायण पूजा व गावाला जेवण करण्याचे ठरवले. सात वर्षांपासून आजही या कुटुंबांने ही प्रथा सुरू ठेवली आहे. गायीला तीन अपत्ये झाली. पहिली लेक मुही मार्डीला दिली, दुसरी पुसेगावच्या सेवागिरी मंदिरात आहे. आता तिसºयांदा तिला एक खोंड व एक कालवड झाली आहे. माऊलीच्या पारायणाचा आधार घेत त्यांनी जन्मलेल्या खोंडाला माऊली तर कालवडीला मुक्ताई नाव देऊन त्यांचे बारसेही घातले.
अन् ती उठून गोठ्याकडे धावली!
सिद्देश्वरीला कोल्हापूरच्या कण्हेरी मठात देण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. तीला न्यायला टेंपो आला. टेम्पोत ती चढावी म्हणून तीच्या आवडीचा खाऊसुध्दा ठेवण्यात आला, पण काही केल्या गायी टेंम्पोत चढेनाच! आवडीचं खाणं टेंम्पोत ठेवले तरीती टेम्पोत चढेना. डोळे पांढरे करून ती तिथेच पडली, नाकातील वेसनीतून रक्त पडल्याचे पाहून लक्ष्मी भारती गहिवरल्या. सात महिन्याची गरोदर सिद्देश्वरीला तुला घरी यायचं हायं का? अस विचारले! हे ऐकताच गायी ताडकनं उठली आणि गोठ्याकडे चालू लागली.