/संडे स्पेशल
प्रेम ही उदात्त भावना. जगाच्या बाजारातही ते विकत मिळत नाही. प्रेम हे व्यक्तीवर होऊ शकते. त्याचबरोबर समाजातील काही व्यक्ती तर मुक्या प्राण्यांवर प्रेम करणाऱ्याही असतात. त्यामधीलच एक जस्मीन अफगाण. ४० मांजरांचा सांभाळ करणाऱ्या, रस्त्यावर केकाटणाऱ्या जखमी कुत्र्यांवरही उपचार करणाऱ्या व भटक्या कुत्र्यांना सांभाळणाऱ्या, दुखापतग्रस्त प्राण्यांसाठी धावून जाणाऱ्या... अशातूनच त्यांचे प्राण्यांवरील प्रेम दिसून येते.
सातारा शहरातील शनिवार पेठेत जस्मीन हरुणरशिद अफगाण राहतात. घरचा बेकरी व्यवसाय. त्यामधून दररोज हजारोंची उलाढाल. घरात आई आणि भाऊ. जस्मीननी हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतलेली आहे. दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्या साताऱ्यात आल्या. साधारणपणे चार वर्षांपूर्वी त्यांच्याकडे इंग्लिश मांजर होते. त्याला त्या खाऊ घालायच्या. त्याचवेळी त्यांच्या घराजवळच मांजरीनीने सोडून दिलेले लहान पिलू होते. हे पिलू जस्मीनच्या घरी यायचे. त्यालाही त्या खाऊ-पिऊ घालू लागल्या. तेथूनच त्यांचे मुक्या प्राण्यांबद्दल प्रेम वाढायला लागले. त्यातच त्यांच्या आईलाही अशा प्राण्यांबद्दल प्रेम होतेच. घरातील सर्वजणच भावनिक असल्याने त्यांचे हे प्राणीप्रेम सतत वाढत गेले.
त्यातूनच साताऱ्यात तीन ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या घरात जवळपास लहान-मोठी ४० मांजरं आहेत. विशेष म्हणजे त्यांची संख्या वाढू नये, त्यांना त्रास होतो तो थांबविण्यासाठी १५ हून अधिक मांजरे व बोक्यांची नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यासाठी होणारा खर्च स्वत: केला आहे. या मांजरांची नावे तर नयनतारा, चिऊ, ओरीयो, गोल्डी, मनू, चिंटू, गोया, पांडा अशी आहेत. कोणालाही नावाने हाक मारा, ते जवळ येऊ थांबणारच. एवढा त्यांचा लळा आहे.
कुत्र्यांबद्दलही त्यांना असाच कळवळा. अडीच वर्षांपूर्वी साताऱ्यातील वाघाची नळी परिसरात कुत्र्याचे एक लहान पिलू पाय जखमी, मांस निघालेले, रक्त सांडत असताना त्यांना दिसून आले. त्यांनी त्या पिलाला घरी आणले आणि उपचार सुरू केले. तसेच ते पिलू घरी ठेवले. आज ते मोठे झाले आहे. तसेच दुसरे पिलू गाडीखाली सापडले असते म्हणून उचलून घरी आणले. त्याला परत त्याच्या आईकडे नेो, पण, तिने स्वीकारले नाही. त्यामुळे त्याला घरीच ठेवले. तसेच तिसरे पिलू एका अपार्टमेंटच्या बंद गाळ्यात होते. तेथून त्याला आणून सांभाळले. अशा या कुत्र्यांची नावेही वैशिष्टपूर्ण आहेत. जिमी, बर्फी आणि बिस्कीट. तसेच त्यांच्या दुकानापुढे भटकी कुत्री बसलेली असतात. त्यांना खाऊ घालण्याचे कामही त्या करतात.
जस्मीन या घरी मुके प्राणी सांभाळतातच. त्याचबरोबर सातारा शहरात त्यांचा एक ग्रुप तयार झाला आहे. जवळपास १३ जण आहेत. शहरात मुक्या प्राण्यांबद्दलचा कॉल आला की सर्वजण तिकडे धावतात. या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक भटकी कुत्री बरी झालेली आहेत. तसेच त्यांच्यावर उपचारही करण्यात येत आहेत. त्याचबरोबर जस्मीन यांनी जखमी झालेले कावळ्याचे पिलूही सांभाळले होते. त्याला आकाशात भरारी घेता आल्यानंतर ते निघून गेले.
घरात ४० मांजरं, तीन मोठे श्वान, तसेच भटक्या श्वानांची संख्या वेगळीच. या सर्वांसाठी खाद्य लागतेच. यावर त्यांचा दररोज दीड ते दोन हजार रुपये खर्च होतो.
कोट :
घर पाहिजे, दागिने हवे आहेत, अशी कोणतीही अपेक्षा मुक्या प्राण्यांना नसते. काय हवं आहे, म्हणूनही ते सांगत नाहीत. फक्त खाण्यासाठी दोन घास हवे असतात. त्यातच आईची शिकवण सामाजिक बांधिलकीची आहे. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. यामधूनच मुक्या प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण झाले व वाढले.
- जस्मीन अफगाण
फोटो आहेत...
..............................................................