वैष्णवांचा मेळा आज लोणंदनगरीत
By Admin | Updated: July 16, 2015 00:05 IST2015-07-16T00:05:16+5:302015-07-16T00:05:16+5:30
जय्यत तयारी : भरपूर, शुद्ध पाण्यासह प्रशासनाकडून विविध सुविधा

वैष्णवांचा मेळा आज लोणंदनगरीत
लोणंद : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी पादुकांच्या नीरा स्नानानंतर गुरुवारी सातारा जिल्ह्यात दाखल होत आहे. पावसाने दिलेली ओढ आणि त्यामुळे पाण्याची अपेक्षित गरज विचारात घेऊन प्रशासनाने वारकऱ्यांना भरपूर आणि शुद्ध पाणी मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. माउलींच्या स्वागतासाठी अन्य अनेक सुविधांसह लोणंदनगरी सजली आहे.वाल्हे, ता. पुरंदर येथून मुक्कामानंतर गुरुवारी अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी लोणंदनगरीमध्ये येत आहे. लोणंद ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीतळावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई केली आहे. पालखीतळ, धोबी घाटावर स्नान व धुण्यासाठी मुबलक पाण्याची व्यवस्था केली आहे. सार्वजनिक पाण्याचे नळ काढण्यात आले आहेत. गुरुवार, दि. १६ रोजी सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळ्याचे सरपंच स्नेहलता शेळके-पाटील व उपसरपंच गणीभाई कच्छी यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे. पालखीच्या आगमनानंतर सार्वजनिक पंगतीच्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी पत्रावळी उचलणे व त्या ठिकाणच्या स्वच्छतेचे काम पाहणार आहेत.
ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या भरल्या आहेत, त्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले असून, पालखी मार्गावरील २२ विहिरी निश्चित करून त्या ठिकाणी पाणी निर्जंतुक करण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
बंदोबस्तासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस जवान असे ६५० पोलीस अधिकारी-कर्मचारी व गृहरक्षक दलाचे २५० जवान नेमण्यात आले आहेत. वैष्णवांच्या मेळाच्या स्वागतासाठी अवघी लोणंदनगरी सज्ज झाली आहे. (वार्ताहर)
स्वच्छतेची विशेष मोहीम
दिंड्या उतरण्याच्या ठिकाणी ४० सार्वजनिक नळांची उभारणी करण्यात आली आहे. गावातील स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी ७० लिटर फिनेल, २० लिटर अॅसिड, १५० खराटे खरेदी करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने लोणंद व पाडेगाव या दोन्ही गावांतील कंटेनर सर्व्हे केला असून, गावातील डासांचा नायनाट करण्यासाठी धूर फवारणी करण्यात आली आहे. तीन वैद्यकीय केंद्रे तयार करून २४ तास सेवा मिळण्याची व्यवस्था आहे.