तरडगावात विसावला वैष्णवांचा मेळा

By Admin | Updated: July 19, 2015 00:40 IST2015-07-19T00:34:12+5:302015-07-19T00:40:55+5:30

पादुकास्पर्शासाठी रांगा : फलटण तालुक्यात प्रवेश; ठिकठिकाणी अभिषेक

Vaishnava's fair is celebrated in Taradgaon | तरडगावात विसावला वैष्णवांचा मेळा

तरडगावात विसावला वैष्णवांचा मेळा

सचिन गायकवाड / तरडगाव
चला पंढरिसी जाऊ। रखमादेवीवरा पाहू।।
डोळे निवतील कान। माना तेथे समाधान।।
अशी अभंगवाणी आळवित मजल-दरमजल करीत आषाढी वारीतील एक-एक टप्पा पार करीत विठ्ठलभेटीच्या आशेने पंढरीला निघालेला वैष्णवांचा मेळा शनिवारी तरडगावच्या संप्रदायिक नगरीत स्वागतानंतर विसावला
लोणंद येथील अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी सोहळ्याने शनिवारी खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश केला. तालुक्याच्या सीमेवर स्वागत केल्यानंतर चांदोबाचा लिंब येथे नेत्रदीपक दौड घेत अश्वांनी वारीतील पहिले रिंगण पार केले. त्यानंतर पालखी सोहळा तरगावड बसस्थानक येथे आल्यानंतर सरपंच अतुल गायकवाड, उपसरपंच माधुरी शिंदे, सदस्य व नागरिकांनी जोरदार स्वागत केले.
पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेत गावच्या प्रवेशद्वारातून गावात येताच दर्शनासाठी झुंबड उडाली.
ग्रामप्रदक्षिणेदरम्यान विठ्ठल मंदिर, मनाळवाडा, चाफळकर वाडा, बापू बुवा मठ या चार ठिकाणी पादुकांचे पूजन व अभिषेक करण्यात आला.
यावेळी गेली दोन दिवस वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटणारे हात पादुकांच्या स्पर्शासाठी पुढे सरसावत होते अन् धन्य झालो असे बोल मुखातून बाहेर पडत होते.
ग्रामप्रदक्षिणेनंतर तळावर पालखी नेण्यात आली. तेथे समाज आरती झाल्यानंतर एक दिवसाच्या मुक्कामासाठी पालखी सोहळा येथे विसावला. दिंड्यातील वारकरी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले तर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
पालखी काळात वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी विविध विभाग, संस्था, तरुण मंडळे तत्परतेने झटताना दिसत होती. ठिकठिकाणी समाजप्रबोधनपर कार्यक्रम झाले.

Web Title: Vaishnava's fair is celebrated in Taradgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.