सातारा जिल्ह्याचे वैभव लोणंदची कांदा बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:18 IST2021-01-24T04:18:51+5:302021-01-24T04:18:51+5:30
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक छोटेसे गाव म्हणून लोणंदची ओळख. मात्र १९५४ मध्ये साडेतीन हेक्टर जागेवर कृषी उत्पन्न बाजार ...

सातारा जिल्ह्याचे वैभव लोणंदची कांदा बाजारपेठ
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक छोटेसे गाव म्हणून लोणंदची ओळख. मात्र १९५४ मध्ये साडेतीन हेक्टर जागेवर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात नाशिक, लासलगाव, पिंपळगाव नंतर कांद्यासाठी लोणंद ही देशातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जात असे. हळव्या कांद्यासाठी देशातील एकमेव बाजारपेठ म्हणून लोणंदकडे पाहिले जात होते. कमी पावसाचा पट्टा, पठारी भाग व पोषक वातावरणामुळे या भागात जून, जुलैमध्ये हळव्या कांद्याची लागण मोठ्या प्रमाणावर केली जाते. चवीला सर्वोत्कृष्ट असल्याने देशातून या कांद्याला सर्वात जास्त मागणी होती. दळणवळणाची उत्तम सोय व बाजार समितीच्या शेजारीच रेल्वेस्टेशन मालधक्का असल्याने कांदा पुणे-मुंबई येथून देश- विदेशात पाठविणे ही सुलभ होत होते. दर आठवड्याला लाखो पिशव्या कांद्याची आवक या बाजार समितीमध्ये होत होती. शेतकरी व व्यापाऱ्यांनाही चांगला पैसा मिळत असल्याने अल्पावधीतच लोणंदची बाजारपेठ बहरत गेली. पुढे लोणंद बाजार समितीसाठी उपबाजार समित्या म्हणून खंडाळा व शिरवळ बाजार समित्या अस्तित्वात आल्या.
लोणंदच्या हळव्या कांद्याला देशातून नव्हे परदेशातून अधिक मागणी असल्याने आणि हळव्या कांद्याची ही एकमेव बाजारपेठ असल्याने या बाजार समितीतून दर आठवड्याला करोडो रुपयांचा कांदा देश-विदेशात पाठविला जात होता.
गरवा कांदाही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणाहून सिंगापूर, मलेशिया, बांगलादेश व दुबई, मस्कत आदी आखाती देशांत निर्यात होत होता. मध्यम आकाराचा आकर्षक रंगाचा चटकदार चवीचा हा कांदा वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये परदेशात निर्यात केला जात होता. मात्र, मागील काही वर्षांपासून शासनाने बाजार समित्या वाढविल्याने हा कांदा इतर बाजारात विभागाला गेला असल्याने सध्या बाजारातील आवक कमी झाली आहे, तरीही मागील पाच वर्षांत या बाजार समितीची वार्षिक उलाढाल २६० कोटींच्या पुढे गेली आहे.
लोणंदच्या बाजारपेठेतील हळवा कांदा हा शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये हुकमी पैसे देणारे उत्पादन म्हणून ओळखले जाते. बाजारपेठेत होणाऱ्या करोडो रुपयांच्या उलाढालीमुळे लोणंदमध्ये कापड, किराणा भुसार व टिंबर मार्केटबरोबरच सर्वच जीवनावश्यक वस्तूच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तीन ते पाच मजली इमारतींचे जाळे निर्माण झाले आहे. सर्व सुविधांनीयुक्त अशा या व्यापारपेठेतील गावात देशातील अनेक राज्यांतील नागरिक स्थायिक झाल्याने लोणंद शहराचा पसाराही वाढला आहे.
(आजही लोणंदच्या कापड बाजारपेठेत सातारा जिल्ह्यातून लोक लग्न बस्त्याच्या खरेदीसाठी येत असतात.)
लोणंदमध्ये कांद्याबरोबरच या बाजार समितीच्या आवारात दर गुरुवारी शेळी-मेंढी बाजार, बैलबाजार, भुसार व कातडी बाजार भरविण्यात येतो. याही बाजारासाठी आपल्या राज्याबरोबर शेजारील राज्यातील शेकडो व्यापारी येत असतात. यावेळीही मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री केली जात असल्याने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक उलाढालीचे केंद्र बनले आहे. आठवड्याला या बाजार समितीमध्ये होणाऱ्या करोडो रुपयांच्या व्यवहारामुळे या भागातील शेतकरी, व्यापारी, मापाडी, हमाल, बाजार आवारात काम करणाऱ्या पुरुष व महिला कामगार वर्गाकडे पैसा येत असल्याने या भागातील बाजारपेठ बहरत गेली आहे.
सर्व सातारकरांना अभिमान वाटावा, अशी लोणंदमध्ये कांद्याची बाजारपेठ असून, ६५ वर्षांनंतरही आजही लोणंदच्या या बाजारपेठेकडे विश्वासार्ह बाजारपेठ म्हणून पाहिले जात असल्याने लोणंदची बाजारपेठ सातारा जिल्ह्यातील वैभवात भर टाकत आहे.
23 लोणंद कांदा01/02