नीरा-देवघरचे पाणी महिन्यात वाघोशीत
By Admin | Updated: December 22, 2016 23:18 IST2016-12-22T23:18:03+5:302016-12-22T23:18:03+5:30
मकरंद पाटील : औद्योगिकीकरणामुळे खंडाळ्याची दुष्काळी म्हणून ओळख पुसली

नीरा-देवघरचे पाणी महिन्यात वाघोशीत
शिरवळ : ‘खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढीला लागले असून, दुष्काळी तालुका म्हणून असलेली ओळख पुसली गेली आहे. खंडाळ्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन धोम-बलकवडीचे पाणी खंडाळ्याच्या शिवारापर्यंत आल्यांनतर आता महिनाभरात शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न झालेल्या नीरा-देवघरच्या कालव्यांचे काम पूर्ण करत पाणी वाघोशीपर्यंत घेऊन जाणार आहे,’ अशी घोषणा आमदार मकरंद पाटील यांनी केली.
सांगवी, ता. खंडाळा येथे विविध विकासकामांच्या व वडगाव पोतनीस याठिकाणी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून नाबार्डच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या वडगाव-पळशी पुलाचे भूमिपूजन व सभामंडप, सोसायटी कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी भोर-वेल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे, खंडाळा पंचायत समिती सभापती नितीन भरगुडे-पाटील, अॅड. शामराव गाडवे, पंचायत समिती सदस्य रमेश धायगुडे, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र तांबे, शिरवळचे उपसरपंच उदय कबुले, वडगाव सरपंच सोनल खामकर, उपसरपंच पंकज खामकर, राहुल खामकर, आदेश भापकर, अजय भोसले, राजेंद्र नेवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता युवराज देसाई, ठेकेदार नंदकिशोर परदेशी, खंडाळा नगराध्यक्ष शरदकुमार दोशी, उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे, बंटी महांगरे आदी उपस्थित होते.
यावेळी पुलाचे, सोसायटी कार्यालयाचे, सभामंडपाचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आमदार थोपटे, नितीन भरगुडे, सोनल खामकर, पंकज खामकर यांनी मनोगतही व्यक्त
केले.
संजय खामकर यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल पवार यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष खामकर यांनी
आभार मानले. (प्रतिनिधी)