वडूज पोलीस इमारतीला मुहूर्त सापडेना..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:22+5:302021-09-13T04:38:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : येथील जुने पोलीस स्टेशन नवीन अद्ययावत अशा ग्रीन इमारतीमध्ये काही दिवसांतच गृहप्रवेश करून ...

वडूज पोलीस इमारतीला मुहूर्त सापडेना..
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : येथील जुने पोलीस स्टेशन नवीन अद्ययावत अशा ग्रीन इमारतीमध्ये काही दिवसांतच गृहप्रवेश करून पोलीस स्टेशनचा कारभार या नूतन इमारतीत सुरू होईल, असे वाटत होते. मात्र, गत दीड वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली ही ग्रीन इमारत गृहप्रवेशासाठी वाट पाहत आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी पडळ कारखाना मृत्यूप्रकरणी संशयित असलेल्या आरोपींना नव्या इमारतीत पोलीस कोठडीचा पाहुणचार घ्यावा लागला होता. अशा नव्या-जुन्या इमारतीचा वापराविना भकास वाटू लागला आहे. त्यामुळे तालुक्याच्या मुख्यालय असलेल्या वडूजनगरीची शोकांतिका आहे, हे सिद्ध होऊ लागले आहे.
जुनी तहसील इमारत ही वापराविना अडगळ होण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता जुनी तहसील इमारत नगरपंचायतीला नाममात्र भाडेतत्त्वावर मिळत असताना होणारी टाळाटाळ खेदजनक आहे. सध्या भाडेतत्त्वावर असणारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय या ठिकाणी स्थानापन्न व्हावे, यासाठी खटाव तालुक्यात एकजुटीने प्रयत्न होणे काळाची गरज आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हे गत अठरा वर्षांपासून भाडेतत्त्वावर आहे. वडूजमध्ये जिल्हास्तरीय न्यायालय, कनिष्ठ न्यायालय असून, खटाव तालुक्याचा क्राईम रेट पाहता हे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वडूज येथेच असणे फार महत्त्वाचे आहे. तसेच भव्य-दिव्य इमारतीमध्ये पोलीस ठाणे आता नूतन ग्रीन इमारतीत जाणार आहे. परंतु सुसज्ज व फर्निचर होऊनदेखील गत दीड वर्षापासून हे पोलीस ठाणे राजकीय नेतेमंडळींच्या गृहप्रवेशासाठी तारखा घेण्यातच धन्यता मानत आहेत. या सुस्थितीतील इमारतीचा दबदबा तालुक्यात मोठा होता. मात्र ही इमारत पूर्णतः मोकळी राहिल्यास हा परिसर भकास होऊन या इमारतीचा दुरुपयोग होईल. ही भीती सर्वसामान्यांना पडलेली आहे.
वास्तविक पाहता पोलीस ठाण्याचेसुद्धा लवकरच नवीन अत्याधुनिक ग्रीन इमारतीमध्ये स्थलांतर होणार होते. मात्र, प्रशासकीय उदासीनता म्हणा अथवा स्थानिक राजकीय नेतेमंडळींची टाळाटाळ त्यामुळे पोलीस ठाण्याचा गृहप्रवेश लांबतोय. परंतु नियतीपुढे तुम्ही-आम्ही नेहमीच हतबल होत असतो. काही महिन्यांपूर्वी पडळ कारखाना अधिकारी मृत्यूप्रकरणी संशयित आरोपींना नवीन पोलीस ठाणे इमारतीत पोलीस कोठडीत ठेवून पाहुणचार करावा लागला होता. पोलीस ठाण्याच्या गृहप्रवेशाअगोदरच संशयित आरोपींना जेलमध्ये ठेवणे हा इतिहास वडूजच्या आत्मचरित्रात नोंद झाला असेच म्हणावे लागेल. सुसज्ज असलेल्या इमारतीत गृहप्रवेशाची टाळाटाळ नेमकी का व कोणासाठी याची चर्चा सर्वसामान्याच्यांतून होत आहे.
चौकट...
इमारत परिसरात अस्वच्छता..
जुनी इमारत बांधकामात २ हजार स्के. फूट इमारतीमध्ये वडूज पोलीस ठाण्याचा कारभार चालतो. गत दोन वर्षांपूर्वी तालुक्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये इतर कार्यालये स्थलांतरित झाली. त्यामुळे वापरात नसलेल्या इमारत परिसरात अस्वच्छता पसरून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही पसरली आहे. त्याच परिसरात सध्या सेतू, आधारकार्ड केंद्र, वडूज चावडी व फेरफार नकला कार्यालये आहेत.
फोटो: सुसज्ज वडूज पोलीस ठाण्याची नूतन ग्रीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आजअखेर उभी आहे. (शेखर जाधव)