लसीचा तुटवडा भासू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:23+5:302021-03-19T04:38:23+5:30
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरण प्रभावीपणे राबविले जात आहे. लसीचा कोणताही तुटवडा आरोग्य विभागाकडून भासू दिला जाणार नाही. ...

लसीचा तुटवडा भासू देणार नाही
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरण प्रभावीपणे राबविले जात आहे. लसीचा कोणताही तुटवडा आरोग्य विभागाकडून भासू दिला जाणार नाही. साठ वर्षांवरील व कोमॉर्बिड नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी केले.
सातारा नगरपालिका संचलित कस्तुरबा रुग्णालयाला डॉ. संजोग कदम यांनी गुरुवारी सकाळी भेट देऊन येथील लसीकरणाचा तसेच आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, नगराध्यक्षा माधवी कदम, नगरसेवक किशोर शिंदे यांच्यासह आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णालयात कशा पद्धतीने लसीकरण केले जात आहे, यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी, लसीचा साठा आदी बाबींचा आढावा घेतल्यानंतर डॉ. संजोग कदम म्हणाले, महाराष्ट्रासह सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, असे असले तरी आरोग्य विभागाने उपाययोजनांची तीव्रता वाढवली असून, लसीकरणाची सक्षम व्यवस्था ठिकठिकाणी उभी केली आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख सहा हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले. नगरपालिका संचलित कस्तुरबा रुग्णालय व गोडोली नागरी सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली आहे. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्तम नियोजनामुळे लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सद्यस्थितीत लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असून, लसीचा तुटवडा भासू देणार नाही. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील कोमॉर्बिड नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. संजोग कदम यांनी केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनीही आरोग्य विभागाकडून राबविल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती आरोग्य उपसंचालकांना दिली. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी आरोग्य सेवेबाबत समाधान व्यक्त केले.
फोटो मेल :
आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी गुरुवारी सकाळी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाला भेट देऊन येथील लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी डॉ. सुभाष चव्हाण, माधवी कदम, किशोर शिंदे, कल्याण राक्षे आदी उपस्थित होते. (छाया : सचिन काकडे)