कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस देण्याचा वेग वाढवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:39 IST2021-03-19T04:39:06+5:302021-03-19T04:39:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व्यापारी, किराणा दुकानदार, भाजी ...

Vaccination should be accelerated to prevent corona infection | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस देण्याचा वेग वाढवावा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस देण्याचा वेग वाढवावा

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व्यापारी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते यांनी टेस्ट करून घेऊनच दुकानात बसावे, अशा टेस्ट करण्यासाठी प्रशासनाकडून मिशन मोडवर काम केले जावे तसेच लस देण्याचा वेग वाढवावा अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात गुरुवारी कोरोना संसर्गाबाबत पालकमंत्री पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

मोबाईलवर मिळणार रिपोर्ट

या पुढे कोरोना टेस्ट केल्यानंतर स्व. क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयाकडून टेस्टचा रिपोर्ट मोबाईलवर एसएमएस च्या माध्यमातून लिंक मिळेल ती लिंक क्लिक केल्यानंतर रिपोर्ट प्राप्त होणार आहे अशी यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे आरटीपीसीआर केल्यानंतर लागणारा विलंब आता संपणार असून घर बसल्या सुविधा प्राप्त होणार आहे. त्यामुळे फार काळ ताटकळत बसण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे जवळचे कोणी पॉझिटिव्ह आले तर उशीर न करता तुमचीही चाचणी करून घ्या असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा दर १६.२१ असून बरे होण्याचा दर ९३.९६ इतका आहे तर मृत्यूचा दर ३.६७ इतका आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

कोरोना प्रतिबंधक लसीला वाढती मागणी

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आता लोक पुढे येत आहेत. हा वाढता प्रतिसाद पाहून जिल्ह्याने लसीची मोठ्या प्रमाणात मागणी राज्य शासनाकडे नोंदविली आहे. कोरोना संसर्ग रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कमीत कमी २० जणांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ग्रामीण भागात या कामासाठी ग्राम दक्षता समितीने आणि शहरातील स्थानिक समित्यांनी प्रशासनाला मदत करावी असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत केले.

Web Title: Vaccination should be accelerated to prevent corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.