कऱ्हाडात लसीकरण ठप्प; लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:41 IST2021-05-07T04:41:14+5:302021-05-07T04:41:14+5:30
कऱ्हाडात बुधवारपासून पुन्हा लसीकरण सुरू करण्यात आले; मात्र फक्त दीडशे लस उपलब्ध झाल्या. तेवढ्याच नागरिकांना तो डोस देण्यात आला. ...

कऱ्हाडात लसीकरण ठप्प; लसीचा तुटवडा
कऱ्हाडात बुधवारपासून पुन्हा लसीकरण सुरू करण्यात आले; मात्र फक्त दीडशे लस उपलब्ध झाल्या. तेवढ्याच नागरिकांना तो डोस देण्यात आला. काही तासातच लस संपल्यामुळे दुपारनंतर लसीकरण बंद झाले. लसीकरणासाठी दुपारी आलेल्यांना लस न घेताच माघारी परतावे लागले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. तालुका आरोग्य विभागाने तालुक्यासाठी पाच हजार लस द्याव्यात, अशी मागणी केली होती; मात्र शहराला केवळ दीडशे लस उपलब्ध झाल्या. सहा दिवस लस पुरवठाच नव्हता; मात्र बुधवारी लस आल्याने ती देण्याची व्यवस्था पालिकेने नागरी आरोग्य केंद्रात केली. लस घेण्यासाठी यापूर्वी नोंदणी केलेल्यांना आरोग्य केंद्राने बोलावले. त्यांना लस दिल्यानंतर दुपारी लस संपल्या. त्यामुळे दुपारनंतर पुन्हा लसीकरण बंद पडले.
वास्तविक, लसीची शहरासह तालुक्याकडून मागणी केली जाते; मात्र पुरेशी लस उपलब्ध होत नाही. दररोज रात्री लसीची मागणी होते. उद्या ती मिळेल, असे सांगितलेही जाते; मात्र मागणीच्या २५ टक्केच लस उपलब्ध होते. काही तासातच ती संपते. त्यामुळे लसीकरणाला गती येत नसल्याचे दिसून येत आहे.