कऱ्हाड तालुक्यात लसीकरण पुन्हा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:39 IST2021-05-19T04:39:57+5:302021-05-19T04:39:57+5:30

कऱ्हाड तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे धास्ती वाढली असून, संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण गतीने होणे गरजेचे आहे. ...

Vaccination halted again in Karhad taluka | कऱ्हाड तालुक्यात लसीकरण पुन्हा ठप्प

कऱ्हाड तालुक्यात लसीकरण पुन्हा ठप्प

कऱ्हाड तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे धास्ती वाढली असून, संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण गतीने होणे गरजेचे आहे. मात्र, लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सुरुवातीला लसीकरणास नागरिकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. लस उपलब्ध असतानाही नागरिक केंद्राकडे फिरकत नव्हते. त्यामुळे केंद्रावर शुकशुकाट जाणवायचा. ६० वर्षांपुढील नागरिकांना लस देताना ही परिस्थिती पाहायला मिळत होती. मात्र, त्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद वाढत गेला. केंद्रावर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रांगा लागत होत्या. गत काही दिवसांपासून तर लसीसाठी वादावादीचे प्रकारही घडत आहेत. नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना, लस मात्र पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. लसीचे ठरावीकच डोस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे केंद्रनिहाय त्याचे वितरण करतानाही आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे.

सोमवारपासून तर तालुक्यातील लसीकरण पूर्णपणे बंद झाले आहे. लसच उपलब्ध नसल्यामुळे सर्व केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. नागरिक केंद्रावर हेलपाटे घालतात. मात्र, केंद्राबाहेर लावलेला लस संपल्याचा फलक पाहून त्यांना माघारी फिरावे लागते. लस कधी उपलब्ध होणार, याबाबतही आरोग्य विभाग निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

फोटो : १८केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राबाहेर लस संपल्याचा फलक लावण्यात आला आहे.

Web Title: Vaccination halted again in Karhad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.