कोरोना हॉटस्पॉट गावात वयोवृद्धांना डावलून लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:38+5:302021-05-23T04:39:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या गावात आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मात्र काही ...

कोरोना हॉटस्पॉट गावात वयोवृद्धांना डावलून लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या गावात आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मात्र काही गावांमध्ये वयोवृद्ध नागरिकांना डावलून लोकप्रतिनिधींनी आपल्या मर्जीतील लोकांचेच लसीकरण केल्याची चर्चा सुरू आहे.
सातारा जिल्ह्यासह कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागाकडे आलेल्या आकडेवारीवरून अनेक गावे कोरोनाची हॉटस्पॉट ठरली आहेत. या गावांतील संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून लसीकरण सत्र सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी कोरेगाव तालुक्यातील अंबवडे सं. कोरेगाव ५० लशी, अंबवडे सं. वाघोली ६०, आपशिंगे ६०, भक्तवडी ४०, तडवळे सं. वाघोली ६०, एकंबे ७० व साप गावास ६० लस पाठवून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात लसपुरवठा झाल्यामुळे जास्त वयापासून कमी वयोगटाप्रमाणे यादी तयार करून टोकन पद्धतीने लसीकरण करावे, अशा सूचना आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या होत्या. याच्या नियोजनाची जबाबदारी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक व आशासेविका यांना दिली होती.
लसीकरण मोहिमेच्या अगोदर दोन दिवस संबंधित ग्रामपंचायतींनी विविध माध्यमांतून लसीकरण केवळ ७० वर्षांवरील व गंभीर आजार असणाऱ्या लोकांनाच केले जाणार आहे. तरी लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन केले होते. लस घेण्यासाठी नोंदणी केलेल्या अनेकांना आपल्याला दूरध्वनीवरून निरोप दिल्यानंतरच लसीकरणासाठी यावे, असे सांगितले हाेते. वयोवृद्ध नागरिकांनी शासनाच्या नियमाप्रमाणे नोंदणी केली होती. लसीकरण मोहिमेदिवशी गावातील लसीकरण केंद्रावर आलेल्या अनेक ७० वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांना ग्रामस्तरीय समितीमधील काही सदस्यांनी लसीकरणाची यादी पूर्ण झाल्याचे सांगून घराकडे पिटाळले. तसेच फ्रंट वर्कर म्हणून काम करणाऱ्यांनाही लसीपासून अलिप्त ठेवण्यात आले, अशी चर्चा आहे. मात्र लोकप्रतिनिधींविरोधात प्रशासनाकडे तक्रार केल्यास आपल्याला आणखी त्रास दिला जाईल, या भीतीपोटी थेट तक्रारी करण्यास नागरिक धजावत नाहीत.
चौकट : शासकीय मोहिमेत भुरटे राजकारण
काही गावांमध्ये भुरटे राजकारण सुरू असून स्वत:च्या पैशातून लसी खरेदी केल्याप्रमाणे स्वत:च्या मर्जीतील ७० वर्षांखालील लोकांना लसीकरण दिले जात असल्याचे आरोप नागरिकांतून होत आहेत. वयोवृद्ध नागरिकांच्या लसीकरण मोहिमेबाबत तक्रारी येत असताना ग्रामपंचायतीमधील विरोधी पक्षनेते म्हणून काम करणार्या सदस्यांनी वयोवृद्धांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे. शासकीय मोहिमामध्येही जर राजकारण केले जात असेल व विरोधी पक्षनेताही पाठीशी ठामपणे उभा राहणार नसेल तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चौकट : लसीकरण लाभार्थ्यांची यादी नोटीस बोर्डवर लावा
लसीकरण मोहीम राबविण्याअगोदरच ग्रामस्तरीय समिती व प्रशासनाने लस देण्यासाठी अंतिम केलेली लस लाभार्थ्यांची नावांची वयासह यादी गावातील नोटीस बोर्डवर लागणे गरजेचे आहे. जेणेकरून ग्रामस्थांना किती वयोगटांतील नागरिकांना लसी दिल्या याची माहिती मिळेल. तसेच लस केंद्रावर अनावश्यक गर्दी होणार नाही. याबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींना सूचना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.