जिल्ह्यात नऊ दिवसांत आली दोनवेळाच लस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:39 AM2021-05-10T04:39:07+5:302021-05-10T04:39:07+5:30

सातारा : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू असले तरी अजूनही मोठ्या प्रमाणात लस मिळत नाही. त्यामुळे सर्वच गटातील ...

Vaccination came to the district twice in nine days ... | जिल्ह्यात नऊ दिवसांत आली दोनवेळाच लस...

जिल्ह्यात नऊ दिवसांत आली दोनवेळाच लस...

Next

सातारा : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू असले तरी अजूनही मोठ्या प्रमाणात लस मिळत नाही. त्यामुळे सर्वच गटातील लसीकरणाची सुरुवात अडखळत आहे. त्यातच गेल्या नऊ दिवसांत जिल्ह्याला दोनवेळाच लस मिळालीय. त्यामुळे लसीकरणाला ब्रेक बसला असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ४३ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयात ही सुविधा सुरु झाली, तर शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे.

एक मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाला आहे. अगोदरच ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातच नवीन समस्या निर्माण होत आहे. कारण, जिल्ह्यात सध्या सवा नऊ लाखांवर ४५ वर्षांवरील कोरोना लस लाभार्थी असून १८ ते ४४ वयोगटातील जवळपास ११ लाखांहून अधिक आहेत.

जिल्ह्याला लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यात ४४० हून अधिक केंद्रांत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे दररोज काही केंद्रेच सुरू असतात.

३० एप्रिलपासून जिल्ह्यात दोनवेळाच कोरोनाची लस आलेली आहे. आलेला हा साठाही मर्यादित होता. त्यामुळे दोन - तीन दिवसांतच लस संपली. कारण, जिल्ह्यात दरररोज २० हजार नागरिकांना लसीकरण करण्याचे टार्गेट आहे. लस उपलब्ध झाल्यास दिवसाला एक लाख नागरिकांना डोस देण्याची क्षमता आरोग्य यंत्रणेत आहे. पण, आतापर्यंत तेवढी लस मिळालेलीच नाही. त्यामुळे लसीकरण अडखळत सुरू आहे.

चौकट :

दोन दिवसांपासून लसीकरण बंद...

जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण सुरू आहे. त्याचबरोबर १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी प्रायोगिक तत्त्वावर काही केंद्रात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. चार दिवसांत लस मिळाली नसल्याने ४५ वर्षांवरील लसीकरण मोहीम दोन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे लोकांना हेलपाटाही खावा लागला.

पॉइंटर :

- जिल्ह्याला आतापर्यंत मिळालेले कोरोना डोस ६,४८,०५०

- लसीकरण झाले ६,३१,०१७

- प्रथम डोस ५,४३,१८४

- दुसरा डोस ८७,८३३

..................

Web Title: Vaccination came to the district twice in nine days ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.