उगवण क्षमता पाहून सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:39 IST2021-05-13T04:39:18+5:302021-05-13T04:39:18+5:30
वाई : ‘खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री दरवाढ झाल्यामुळे या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता ...

उगवण क्षमता पाहून सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरावे
वाई : ‘खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री दरवाढ झाल्यामुळे या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरणे फायदेशीर ठरेल,’ असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी केले.
केंजळ परिसरात सोयाबीन बियाणे उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिक प्रसंगी ते बोलत होते. या वेळी कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब शेलार, कृषी सहायक सुनील फरांदे, विक्रम मोहिते आणि शेतकरी उपस्थित होते.
धुमाळ म्हणाले, ‘शेतकरी मिळेल ते बियाणे वापरतात, त्याचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर होतो. त्यामुळे असे बियाणे वापरण्यापूर्वी उगवणक्षमता चाचणी घेतली तर योग्य बियाणे वापरले जाऊन भविष्यात खराब बियाणे वापरल्यामुळे उत्पादनामध्ये होणारे नुकसान टाळता येईल आणि उत्पादन खर्चामध्येही बचत करता येणे शक्य होईल. सोयाबीन बियाणे उगवणक्षमता चाचणी घेत असताना घरचे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या बियाण्यातून मूठभर बियाणे घ्यावे. त्यातून शंभर दाणे स्वच्छ धुतलेल्या व ओल्या केलेल्या गोणपाटाच्या अर्ध्या भागात दहाच्या संख्येने दहा ओळींत पसरावेत. प्रत्येक दाणा व ओळीमध्ये एक इंच अंतर ठेवावे. त्यानंतर पाच ते सहा दिवस त्यावर पाणी शिंपडावे. १०० पैकी ७० ते ८० बियाणे अंकुरित झाल्यास एकरी ३० किलो, ६० ते ७० दाण्यांना ३५ ते ४० किलो बियाणे पेरावे. ६० पेक्षा कमी बियाणे अंकुरित झाल्यास असे बियाणे वापरू नये.’