जनावरे धुण्यासाठी पाईपऐवजी बादलीचा वापर
By Admin | Updated: May 24, 2016 00:51 IST2016-05-23T22:43:14+5:302016-05-24T00:51:47+5:30
दुग्ध व्यावसायिकांचीही सतर्कता : मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत - जलमित्र

जनावरे धुण्यासाठी पाईपऐवजी बादलीचा वापर
सातारा : जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुग्धोत्पादनासाठी असणाऱ्या गायी, म्हशींना उन्हाळ्याच्या दिवसात तर दोन दिवसांतून एकदा धुवावेच लागते. सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीमुळे दुग्ध व्यावसायिकांनी पाईपऐवजी बादलीतील पाण्याने जनावरे धुण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे शेकडो लिटर पाण्याची बचत होण्यास मदत झाली आहे.
दरम्यान, टंचाईमुळे काही शेतकऱ्यांनी मुक्त संचार गोठ्याचेही नियोजन केले आहे. त्यामुळेही पाण्याचा वापर कमी होऊ लागला आहे.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता अधिक आहे. उकाड्याने माणसाचा जीव हैराण झाला आहे. त्याठिकाणी जनावरांची काय स्थिती असेल हा विचारच करवत नाही. अशा स्थितीत जनावरांना पुरेसे पाणी पाजणे, धुणे महत्त्वाचे असते. तसेच दुग्ध उत्पादन देणाऱ्या जनावरांना खूप सांभाळावे लागते. सध्यातर जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसाय वाढला आहे. गावोगावी दूध देणाऱ्या जनावरांचे गोठे निर्माण होऊ लागले आहेत. जर्सी, गीर, होस्टन अशा गायींच्या तर मुऱ्हा, म्हैसाणा, पंढरपुरी जातीच्या म्हशी गोठ्यात दिसून येत आहे. या दूध देणाऱ्या जनावरांना दोन-तीन दिवसांतून एकदा अंघोळ घालणे आवश्यकच असते. असे असलेतरी उन्हाळ्याच्या काळात तापमान वाढलेले असते. ते मेंटेन करण्यासाठी जनावरांना दररोज धुवावे लागते. गायीला दोन दिवसांतून एकदा धुतले तर चालते; पण म्हशीला दररोज धुवावेच लागते. तरच दुग्धोत्पादनावर परिणाम होत नाही.
सध्या तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्याठिकाणी जनावरांच्या धुण्याचे काय असा प्रश्न आहे. असे असलेतरीही काही शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेतानाच पाणी बचतीचाही उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. यापूर्वी शेतकरी गायी, म्हशी धुण्यासाठी मुबलक पाणी वापरत. पाण्याच्या टाकीला पाईप जोडून त्याने जनावरे धुण्यात येत होती. टंचाईमुळे बादलीने पाणी घेऊन जनावरे धुवावी लागत आहेत. यामुळे पाणी वाया जाणे बंद झाले. (प्रतिनिधी)
पाणी बचत महत्त्वाची...
तीव्र उन्हाळा आहे. त्यामुळे दूध देणाऱ्या जनावरांना दररोज धुणे आवश्यक आहे. मात्र, सध्या टंचाई असल्याने पाणी बचत महत्त्वाची झाली आहे. त्यासाठी जनावरांना पाईपऐवजी बादलीने धुण्यात येत आहे. यामुळे शेकडो लिटर पाण्याची बचत होत आहे.
- सतीश जगताप, दुग्ध व्यावसायिक, वरकुटे मलवडी
जनावरे धुतानाही पाण्याची बचत
सध्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. पाणी कमी वापरावे लागत आहे. जनावरे धुण्यासाठीही पाण्याची बचत करण्यात येत आहे. दोन दिवसांतून दूध देणारी जनावरे धुण्यात येतात. त्यासाठी बादलीत पाणी घेऊन जनावरे धुणे सुरू केले आहे.
- श्रीकांत कदम, देऊर