‘उरमोडी’तून पाणी सोडले

By Admin | Updated: July 30, 2014 23:18 IST2014-07-30T23:11:41+5:302014-07-30T23:18:01+5:30

पावसाचा जोर वाढला : कोयना धरणात ६१.५२ टीएमसी पाणी

'Urmodi' leaves water | ‘उरमोडी’तून पाणी सोडले

‘उरमोडी’तून पाणी सोडले

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. धरण पाणलोट क्षेत्रात संततधार वाढल्यामुळे पाणीसाठाही वाढू लागला आहे. कोयना धरणात बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६१.५२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. दरम्यान, उरमोडी पाणलोट क्षेत्रात जोरदार सरी कोसळत असल्यामुळे आणि येवा वाढल्यामुळे धरणातून नदीपात्रात प्रतिसेकंद २००० क्युसेक पाणी सोडले आहे. परिणामी नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाटण /कोयनानगर : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. खास करून धरण पाणलोट क्षेत्रात संततधार कायम असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. कोयना धरणात गेल्या ३६ तासांत ५.३५ टीएमसी इतका पाणीसाठा वाढला असून, सांयकाळी सहा वाजेपर्यंत झालेला साठा ६१.५२ टीएमसी इतका होता.
मंगळवारी सकाळी आठ वाजता धरणात ५६.१८ टीएमसी इतका पाणीसाठा होता.
परळी : उरमोडी धरणक्षेत्रात जोरदार सरी कोसळत असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता धरणात ८.८९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. धरण व्यवस्थापनाने दुपारी बारा वाजल्यानंतर धरणाच्या दरवाजातून प्रतिसेकंद २००० क्युसेक इतके पाणी नदीपात्रात सोडले. यामुळे उरमोडी नदी तिरावरील सुमारे १४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तारळे : तारळीची पाणीसाठवण क्षमता ५.८५ टीएमसी असून, आजमितीस ४.८९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणातून ३,१८२ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे.
वाई : बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत धोम धरणात ७.५६, कण्हेर धरणात ८.०२, बलकवडी धरणात ३.१४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. (प्रतिनिधी)
महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस..!
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण २३.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, आजअखेर झालेला पाऊस ६२१९.५ मिमी तर तालुकानिहाय सरासरी ५६५.४ मिमी इतकी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १२३.२ मिमी पावसाची नोंद महाबळेश्वर तालुक्यात झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात २५३.७ मिमी पाऊस झाला. सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आजअखेर झालेला पाऊस मिमीमध्ये असा : सातारा २०.४ (४८१.५), जावळी ४६.२ (७७६.८), कोरेगाव ४.७ (१६१.६), कऱ्हाड ८.३ (३०५.६), पाटण ३४.१ (८१३.२), फलटण ०.९ (६४.४), माण ०.८ (९१.९), खटाव ३.२ (१७७.३), वाई ९.४ (२१८.२), महाबळेश्वर १२३.२ (२९९५.३), खंडाळा २.५ (१३३.७)

Web Title: 'Urmodi' leaves water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.