साताऱ्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांत चिंतेचे ढग, पिकांसह फळबागांना धोका 

By नितीन काळेल | Published: January 9, 2024 12:18 PM2024-01-09T12:18:46+5:302024-01-09T12:19:52+5:30

अजिंक्यतारा धुक्यात न्हाला..

Unseasonal rain in Satara; threat to crops and orchards | साताऱ्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांत चिंतेचे ढग, पिकांसह फळबागांना धोका 

साताऱ्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांत चिंतेचे ढग, पिकांसह फळबागांना धोका 

सातारा : जिल्ह्यात अवकाळी ढग दाटले असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास सातारा शहरात पावसाने हजेरी लावली. तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणीही अवकाळी पाऊस पडला. यामुळे दाट धुके निर्माण झाले होते. या धुक्याचा व ढगाळ वातावरणाचा पिकांसह फळबागांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पारा घसरला आहे. किमान तापमान बहुतांशीवेळा १५ अंशाच्या खाली राहत आहे. परिणामी थंडीचा कडाका वाढल्याने ज्वारीसारख्या पिकावर चिकटा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. तसेच इतर पिकांच्या वाढीवरही परिणाम झालाय. असे असतानाच मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणही निर्माण होत होते. यामुळे अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज होता. हा अंदाज आता खरा ठरला असून सोमवारी सायंकाळपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे वातावरणातही चांगलाच बदल झाला आहे.

सातारा शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरुपात पाऊस पडला असलातरी हवेत गारवा निर्माण झाला होता. तसेच या पावसामुळे माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्यांवर परिणाम झाला. तर सकाळपासून दुपारी १२ पर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झालेच नाही. त्याचबरोबर जिल्ह्याच्या अनेक भागातही हलक्या स्वरुपात अवकाळी पाऊस झाल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असतानाच ढगाळ वातावरण तयार होत आहे. तसेच दाट धुकेही पडत आहे. याचा फटका अधिक करुन द्राक्षे, डाळिंबसारख्या फळबागांना बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. कारण, दीड महिन्यांपूर्वी अवकाळी पाऊस होऊन बागांना मोठा फटका बसलेला. तशीच स्थिती आता निर्माण झालेली आहे. तर ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवरही धुके आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊ शकतो. यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अजिंक्यतारा धुक्यात न्हाला..

सातारा शहराच्या बाजुलाच अजिंक्यतारा किल्ला आहे. मंगळवारी पहाटे शहर आणि परिसरात अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. यामुळे दाट धुकेही निर्माण झाले होते. पहाटेच्या सुमारास समोरील काही अंतरावरीलही दिसत नव्हते. तर अजिंक्यतारा किल्ल्यालाही धुक्याने वेढले होते. सकाळी आकरा वाजेपर्यंत किल्ल्यावर दाट धुके दिसून येत होते. त्यानंतर धुक्याची तीव्रता कमी होत गेली.

पुसेगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका 

पुसेगाव : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाच्या हलक्या सरीने पुसेगाव व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामातून ज्वारी, गहू यासारखा वर्षभरासाठी लागणारा पसा कुडता सांभाळताना शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे. तसेच वीट उत्पादन करणाऱ्या कामगारांना तसेच मालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपयांची उचल देऊन लातूर, नांदेड, बीड भागातून विटा थापण्यासाठी आलेले कामगारांची मोठी गोची झाली आहे. विटा पावसाने भिजल्याने मालकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.

Web Title: Unseasonal rain in Satara; threat to crops and orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.