कारवट ग्रामपंचायतीत बिनविरोध महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:56+5:302021-02-05T09:12:56+5:30
पाटण तालुक्यातील अतिदुर्गम ठिकाणी साडेसहाशे लोकसंख्या असलेले कारवट गाव वसले आहे. गत २० वर्षांपासून या गावाने निवडणूक बिनविरोध करण्याचा ...

कारवट ग्रामपंचायतीत बिनविरोध महिलाराज
पाटण तालुक्यातील अतिदुर्गम ठिकाणी साडेसहाशे लोकसंख्या असलेले कारवट गाव वसले आहे. गत २० वर्षांपासून या गावाने निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा पाडला आहे. गावातील ज्येष्ठांसह, युवक एका विचाराने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेतात. हा निर्णय कौतुकास्पद आहे. तसेच इतर गावांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने प्रेरणादायीही म्हणावा लागेल. तालुक्यात महिलाराज असलेली ही एकमेव ग्रामपंचायत आहे. निवडणूक कोणतीही असली तरी एकदिलाने, एकविचाराने सर्वजण ठाम राहतात, हे गावाचे वैशिष्ट्य आहे. गावात निवडणूकच लागत नसल्याने तंटामुक्तीचा पुरस्कारही गावाला मिळाला आहे. ग्रामपंचायतीत एकूण सात सदस्य आहेत. त्यांपैकी दोन जागा रिक्त असल्याने पाच जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, नेहमीप्रमाणे सर्वांच्या विचारांनी उषा रवींद्र शिंदे, जिजाबाई दगडू कदम, अश्विनी राजाराम सोनावले, भारती किसन शिंदे, सुशीला लक्ष्मण सावंत या महिलांच्या हाती सत्ता देण्यात आली. चूल आणि मूल सांभाळत आता या महिला गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरसावल्या आहेत.
आगामी पाच वर्षांत गावाचा कायापालट करण्याचा निश्चय या महिलांनी केला आहे. गावातील ज्येष्ठांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी महिलांनी एकजूट केली आहे.
फोटो : ०३केआरडी०३
कॅप्शन : कारवट (ता. पाटण) ग्रामपंचायतीत सदस्यपदी पाच महिलांची एकमुखी निवड करण्यात आली असून, या महिला सदस्यांनी गावाचा कायापालट करण्याचा निश्चय केला आहे.