लिफ्ट मागणार्या प्रवाशाला अपहरण करून लुटले अज्ञात तिघांवर गुन्हा : पडक्या बंगल्यात अपहृताला ठेवले डांबून
By Admin | Updated: May 17, 2014 00:27 IST2014-05-17T00:26:39+5:302014-05-17T00:27:05+5:30
सातारा : महामार्गावरून लिफ्ट मागणे यापूर्वी अनेक प्रवाशांच्या अंगलट आले असतानाही काही प्रवाशी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

लिफ्ट मागणार्या प्रवाशाला अपहरण करून लुटले अज्ञात तिघांवर गुन्हा : पडक्या बंगल्यात अपहृताला ठेवले डांबून
सातारा : महामार्गावरून लिफ्ट मागणे यापूर्वी अनेक प्रवाशांच्या अंगलट आले असतानाही काही प्रवाशी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. येथील अजंठा चौकामध्ये महामार्गावर उभे राहून लिफ्ट मागणार्या प्रवाशाचे अपहरण करून तिघाजणांनी त्याच्याकडील ऐवज आणि रोकड लांबवली. एवढेच नव्हे तर संबंधित आरोपींनी त्या प्रवाशाला शहराजवळील एका पडक्या बंगल्यात डांबूनही ठेवले होते. असेही तपासात समोर आले आहे. याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयवंत गणपती लोहार (वय ४४ मुळ रा.वाटेगाव ता. वाळवा, सध्या रा. धनगरवाडी, सातारा) हे दि. १३ रोजी पहाटे सव्वासहाच्या सुमारास वाटेगावला निघाले होते. येथील अंजठा चौकामध्ये महामार्गावर ते उभे राहिले होते. पुणे बाजूकडून झेन कार (एमएच ०९ ६६९१) आली. त्या कारमधील तीन व्यक्तींनी त्यांना ‘कासेगावपर्यंत सोडतो,’ असे सांगितले. त्यामुळे लोहार त्यांच्या कारमध्ये बसले. चालकाने कार खिंडवाडीपासून महामार्गावरून आडरानात नेली. त्यानंतर सोनगाव कचरा डेपो परिसरातील एका पडक्या बंगल्यात सर्वजण गेले. त्या ठिकाणी लोहार यांना डांबून ठेवण्यात आले. त्यांच्याकडील ८ हजारांची रोकड आणि एटीएम काढून घेतले. त्यानंतर त्यांना सोडून दिले. अपहरणकर्ते शेंद्रेमार्गे निघून गेले. या घटनेनंतर लोहार यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ ठिकठिकाणी नाकाबंदी केली. मात्र अपहरणकर्ते सापडले नाहीत. त्यांच्या कारचा नंबर मिळाला असल्यामुळे लवकरच अपहरणकर्ते सापडतील, असा विश्वास पोलिसांना आहे. (प्रतिनिधी)