अखंड विजेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:28+5:302021-02-06T05:13:28+5:30
सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. सकाळ, संध्याकाळी कडाक्याची थंडी तर दिवसभर कडक ऊन पडत ...

अखंड विजेची मागणी
सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. सकाळ, संध्याकाळी कडाक्याची थंडी तर दिवसभर कडक ऊन पडत आहे. त्यामुळे गहू, हरभरा, लसूण, कांदा, बाजरी, मका, ज्वारी या पिकांना पाण्याची गरज भासत असते. त्यासाठी शेतीसाठी अखंड वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
०००००००
स्वस्त धान्याची मागणी
शिरवळ : सातारा जिल्ह्यातील केशरी रेशनकार्ड धारकांना शासनातर्फे मे, जून महिन्यात धान्य दिले जात होते. मात्र ते आता बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचे हाल होत आहे. त्यामुळे जिल्हा शासनाने सरसकट केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. याबाबत संबंधित विभागाला वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे, तरी दखल घेतली जात नाही.
००००००
तहसील कार्यालयात ग्रामस्थांची गर्दी
सातारा : महाविद्यालये अजूनही बंद असल्याने तरुणाई सध्या घरीच आहे. त्यामुळे नोकरी तसेच शाळा-महाविद्यालयात वारंवार गरज भासत असलेल्या विविध शासकीय दाखले काढण्यासाठी तरुणांची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे साताऱ्यातील तहसील कार्यालय परिसरात तरुणांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
००००
उन्हाची तीव्रता वाढली
सातारा : साताऱ्यासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. फेब्रुवारीचा पहिलाच आठवडा असतानाही एप्रिल महिन्याप्रमाणे ऊन पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.
---------
केळीचे दर कमी
सातारा : सध्या थंडीचे दिवस असल्याने हंगामी फळे खाल्ल्यामुळे आरोग्याला हितावह ठरते. तसेच साताऱ्याच्या बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून केळीची आवक वाढली आहे. सरासरी चाळीस ते पन्नास रुपये डझन दराने केळीची विक्री सुरू आहे. त्यामुळे केळीला साताऱ्यातून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
-----------
शिवसेना सातारा शहरप्रमुख पदाचा राजीनामा
सातारा : शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख निमिश रमेशकुमार शहा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा सातारा, सांगलीचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्याकडे दिला आहे. यामध्ये वैयक्तिक अडचणींमुळे राजीनामा देत आहे. तसेच यापुढे या पदासंबंधी कोणतीही जबाबदारी माझ्यावर राहणार नसल्याचे म्हटले आहे.
००००००
एटीएममध्ये गैरसोय
वडूज : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका कमी झालेला नाही. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जाते. बँकांमध्ये प्लास्टीक कागदाचे पडदे तयार केले आहेत. मात्र एटीएममध्ये म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका संभवत असतो.
०००००००००
आठवडा बाजारात गर्दी
सातारा : साताऱ्यातील जुना मोटार स्टॅण्ड परिसरात दर रविवारी आठवडा बाजार भरत असतो. या ठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी भाजी विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र अनेकजण कोरोनाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत नाहीत. अनेक जण गर्दीमध्येही विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे धोका वाढत आहे.
००००००००
खाऊचे पैसे केदारनाथ मंदिर उभारणीला
परळी : कोरोनामुळे यात्रा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजऱ्या होत आहेत. नित्रळ येथील केदारनाथाची यात्रा साध्या पध्दतीत करण्यात आली. केदारनाथ पंच धाम देवालयाची उभारणीही अंतिम टप्प्यात आहे. मंदिराच्या उभारणीत सहभाग असावा म्हणून नित्रळ येथील संदीप विठ्ठल चिकणे यांची कन्या ज्ञानेश्वरी हिने खाऊचे रोजच्या गल्ल्यात साठवून ठेवलेले पाच हजार एक रुपयांची देणगी दिली.
००००००००
स्कूल बसमध्ये गर्दी
सातारा : जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. दिवसेंदिवस मुलांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे काही शाळांमध्ये स्कूल बसने विद्यार्थी शाळेला जात आहेत. यामध्ये जास्तीत जास्त मुले कोंबली जात असल्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडत आहे. संबंधितांना योग्य त्या सूचना करण्याची गरज आहे.
०००००००
एसटी बस थांबा बाहेरुन
कोरेगाव : सातारा-पंढरपूर राज्य मार्गावरील कोरेगाव हे महत्वाचे ठिकाण आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या गाड्या कोरेगाव बसस्थानकात फारच कमी प्रमाणात जातात. त्या थेट जात असल्याने नागरिकांनीही बसस्थानकात जाणे कमी केले आहे. ते मुख्य रस्त्यावर थांबत असतात.