व्हेंटिलेटर बेडअभावी युवकाचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:53+5:302021-05-23T04:39:53+5:30
ऐन तारुण्यात एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. अपूर्ण सुविधांमुळे अजून किती जणांचा जीव जाणार? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत ...

व्हेंटिलेटर बेडअभावी युवकाचा दुर्दैवी मृत्यू
ऐन तारुण्यात एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. अपूर्ण सुविधांमुळे अजून किती जणांचा जीव जाणार? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या व मृत्यूचा कहर वाढत चालला आहे. यात पहिल्या लाटेत वयोवृद्ध नागरिकांना कोरोनाने लक्ष्य केले होते; मात्र दुसऱ्या लाटेचा विचार करता लहान बालकांपासुन ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच कोरोनाने घेरले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाची दाहकता पाहता सर्वजण दहशतीच्या छायेखाली दिसत आहेत.
मल्हारपेठ विभागातील एका गावातील युवकाला आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला त्याला सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्याने कोरोना चाचणी केली. त्यावेळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. लक्षणे तीव्र नसल्यामुळे घरीच त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रात्री अचानक त्याला दम लागण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काही युवकांनी त्याला पाटण येथील कोविड हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले; मात्र मध्यरात्री त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला ऑक्सिजन लावला. तसेच संबंधित युवकाला व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता असल्यामुळे नातेवाईकांना त्याबाबत सांगण्यात आले. नातेवाईक तसेच मित्रांनी सातारा, कऱ्हाडमध्ये व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कोठेही बेड उपलब्ध झाला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता व्हेंटिलेटर बेडअभावी त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
संबंधित युवक हुशार व मनमिळावू स्वभावाचा होता. पुण्यातील आयटी कंपनीतील नोकरी सोडून त्याने व्यवसाय सुरू केला होता;मात्र ऐन उमेदीत त्याच्यावर कोरोनारूपी काळाने घाला घातला.