उंडाळकरांची सून राजकारणाच्या उंबरठ्यावर !

By Admin | Updated: March 9, 2016 01:13 IST2016-03-09T01:08:01+5:302016-03-09T01:13:24+5:30

कऱ्हाड तालुक्यातील घडामोडी : स्वातंत्र्य सेनानींची नातसून --कारणराजकारण

Undalkarakarera politics on the threshold! | उंडाळकरांची सून राजकारणाच्या उंबरठ्यावर !

उंडाळकरांची सून राजकारणाच्या उंबरठ्यावर !

प्रमोद सुकरे - कऱ्हाड --कऱ्हाड : दुर्मीळ टपाल तिकिटांचा संग्रह जोपासलेल्या छंदाची माहिती देण्यासाठी गीतांजली पाटील-उंडाळकरांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना रविवारी निमंत्रित केले. यावेळी पत्रकारांनी टाकलेल्या राजकीय गुगलीवर ‘होय, संधी मिळाल्यास अन् योग्य वेळी मी राजकारणात येईन’ असा षटकारही त्यांनी ठोकला. त्यामुळे त्यांच्या निमंत्रणामागे निमित्त जरी टपाल तिकिटांची माहिती देणे असले तरी त्यांना वेध मात्र, राजकारणातील तिकिटांचे लागले आहेत, हे निश्चित.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर यांची नातसून राजकारणाच्या उंबरठ्यावर येऊन उभी आहे. तो उंबरठा ‘त्या’ कधी ओलांडणार याची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणात गेली चार दशके माजीमंत्री उंडाळकर परिवार सक्रिय आहे. विलासराव पाटील-उंडाळकरांनी विधानसभा विजयाची ‘सप्तपदी’ याच मतदार संघातून पूर्ण केली; पण या दरम्यान कुटुंबातील कोणत्याच महिला सदस्याला राजकीय पटलावर मात्र येऊ दिले नाही. त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारी तर कोसो दूर; पण आज काळ बदलला आहे. तब्बल ६२ वर्षांनंतर प्रथमच उंडाळे ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. धुसफूस समोर आली. असो...
राजकारणात असणाऱ्या अनेक नेत्यांनी संधी मिळताच कुटुंबातील महिला सदस्यांना राजकारणात सक्रिय क रून घेतलय ! मग उंडाळकर कुटुंबातील महिला सदस्यांना राजकारणात यावे असे का वाटू नये.
राजकारणात येण्यासाठी वारसा महत्त्वाचा मानला जातो. तो गीतांजली पाटील यांना सासर अन् माहेर दोन्हींकडून मिळाला आहे. त्यांचे सासरे जयसिंगराव पाटील हे रयत सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तर पती अ‍ॅड. आनंदराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत. याशिवाय माजीमंत्री बाळासाहेब थोरात, सोलापूरचे विजयसिंह मोहिते- पाटील हे माहेरकडून जवळचे पाहुणे लागतात. अन् हो याशिवाय राजकारणात येण्यासाठी हवी असते ती प्रबळ इच्छाशक्ती गीतांजली पाटील यांनी ती बोलूनही दाखविली आहे. बोलताना मात्र त्यांनी संधी मिळाल्यास अन् योग्यवेळी राजकारणात येईन असे सुचक मत व्यक्त केले आहे; पण त्यांना ही राजकीय संधी घरातून कधी मिळणार अन् योग्य वेळ कधी येणार हे त्यांचे त्यांनाच माहीत. राजकारणात संधी क्वचित मिळते. ती हिसकावून घ्यायला लागते हे त्यांना सांगण्याची गरज नसावी. अन् हो बदल हा निसर्गाचा नियम आहे. हा बदल उंडाळकर स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


पंचायत समिती की जिल्हा परिषद
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजीकच्या काळात होऊ घातल्या आहेत. गट अन् गण यांची नव्याने पुर्नरचना होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुलाखालून बरेच पाणी जाणार हे निश्चित. उंडाळे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी कोणते आरक्षण पडेल हे आज सांगता येत नाही; पण खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण पडले तर गीतांजली पाटील त्यावर दावा करतील, अशी उंडाळकर गटाच्या कार्यकर्त्यांच्यात चर्चा आहे.
कऱ्हाड तालुक्यात राजकारणात असणाऱ्या अनेक घराण्यातील महिला राजकारण अथवा समाजकारणामध्ये सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारासाठी कंबर कसली होती. तर भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी गौरवी भोसले तर मातोश्री उत्तरा भोसले याही गावोगावी बैठका घेत होत्या. उत्तरा भोसले तर कृष्णा उद्योग समुहातील सरीता बझारचे काम स्वत: पाहतात. तर गौरवी भोसलेही कृष्णा फाउंडेशनच्या कामामध्ये लक्ष घालताना दिसतात.
यशवंतराव मोहिते यांच्या स्रुषा डॉ. सविता इंद्रजित मोहिते याही जाई मोहिते पतसंस्था व शिक्षण संस्थेचे काम व्यक्तिगत लक्ष घालून पाहतात. त्यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रत्यक्षात कधी रिंगणात उतरल्या नाहीत. कृष्णेची सत्ता असताना अविनाश मोहिते यांच्या मातोश्री नूतन मोहिते याही कारभार हाकताना मदत करीत होत्या.

Web Title: Undalkarakarera politics on the threshold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.