नको नुसती मशिनरी, हवा आपुलकीचा स्पर्श

By Admin | Updated: December 2, 2014 00:22 IST2014-12-01T22:55:58+5:302014-12-02T00:22:37+5:30

कालानुरूप बदलाचा फटका : ग्रामीण भागात हवी दर्जेदार वैद्यकीय सेवा

Uncooked machinery, touch of air affection | नको नुसती मशिनरी, हवा आपुलकीचा स्पर्श

नको नुसती मशिनरी, हवा आपुलकीचा स्पर्श

सातारा : रात्री-अपरात्री सेवा देणारे, तपासणारे डॉक्टर हे रुग्णांना कुटुंबापेक्षा जवळचे वाटत होते. पण, कालानुरूप त्यामध्ये बदल होत गेले. गेल्या काही वर्षांत तर कट प्रॅक्टिसमुळे डॉक्टरांची प्रतिमा कुठेतरी मलीन झाल्यासारखे दिसत आहे. त्यांची प्रतिमा सुधारावी, डॉक्टर व रुग्ण यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण होण्यासाठी नको नुसती मशिनरी तर हवाय विश्वासाचा स्पर्श, अशी अपेक्षा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
वैद्यकीय व्यवसाय हा अनाधिकालापासून सुरू आहे. १९९५ पर्यंत हा एक ‘नोबल प्रोफेशन’ म्हणून ओळखला जात होता. समाजात आदराचे आणि कुटुंबामध्ये एक सदस्य म्हणून डॉक्टरांच्या शब्दाला मान दिला जात होता. त्यावेळी पदवीपेक्षा नात्याला मोठी किंमत होती; परंतु समाजात बदल घडत गेले त्याप्रमाणे वैद्यकीय व्यवसायातही बदल घडत गेले. इतर क्षेत्रात कमिशन घेत असतील तर आम्ही का नाही, असे समजून या व्यवसायातही ही भावना वाढीस लागली. याच दरम्यान समाजात दोन बदल घडून आले. डॉक्टरांना ग्राहक संरक्षक कायद्याच्या चौकटीत बांधले गेले. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर हे नाते मोडीस निघाले. रुग्ण हा ग्राहक आणि डॉक्टर हा सेवा देणारा घटक झाला. दुसरे म्हणजे, ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना मोडीत निघाली. काहीही झाले तरी आम्ही मोठ्या रुग्णालयात जाणार. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सल्लेच घेणार. या भावनेपोटी जीवा भरवशाचा असणाऱ्या फॅमिली डॉक्टरला समाज मुकला. यासंदर्भात खऱ्या अर्थाने व्यापक जनजागृती आणि बदलाचीही गरज आहे.
खेडोपाडी प्रॅक्टिस करणारे, रुग्णांना दिवसरात्र आणि ऊन, वारा व पावसाची परवा न करता सेवा देणारे डॉक्टर्स कट घेतात. म्हणून त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करता येणार नाही. यामध्ये बदल घडवायचा असेल, तर शासनाने पुढे आले पाहिजे. विशेषत: ग्रामीण भागात सुविधा देणाऱ्या डॉक्टरांकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. शासनाकडून डॉक्टर, दवाखाने यांना कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात येत नाही. अशा परिस्थितीत दवाखाने सुरू करणे आणि ते चालविणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे होऊन गेलेले आहे. त्यामधूनच चुकीच्या व घातक परंपरा निर्माण होत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
जनरल प्रॅक्टिशनर हे उच्चशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर आणि समाज यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात. ग्रामीण भागातील अशिक्षित, गरीब रुग्ण असो, किंवा उच्चशिक्षित, श्रीमंत रुग्ण असो. यापैकी कोणालाही नक्की कोणत्या डॉक्टरांकडे जायचे आहे, हे माहीत नसते. कोणत्या रुग्णालयात कोणत्या सोयी आहेत, हे माहीत नसते. अशावेळी पर्याय सुचविण्याचे काम जनरल प्रॅक्टिशनरर्स करत असतात. या सूचनांचा मोबदला म्हणून कट देण्याची पद्धतही रुढ झाली. यामुळे रुग्णालयांच्या बिलामध्येही वाढ झाल्याचे दिसते.
यावर योग्य पर्याय म्हणजे ‘फॅमिली डॉक्टर’ हेच आहे. या संकल्पनेचे पुनर्जीवन होणे महत्त्वाचे आहे. तसेच जनरल प्रॅक्टिशनरचा रुग्ण जेथे उपचार घेत आहे. त्याठिकाणी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा आहे. आपला रुग्ण उपचारासाठी दाखल आहे, तेथे आपली प्रॅक्टिस सोडून जाणे, तेवढा वेळ देणे अशा डॉक्टरांनाच त्यांच्या सेवेचा योग्य मोबदला देण्यास काहीही हरकत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (लोकमत टीम)

समाजाचा जबाबदार घटक म्हणून डॉक्टरांनी कोणत्याही रुग्णाला अनावश्यक चाचण्या करण्याचा, हॉस्पिटल अ‍ॅडमिशन तसेच आॅपरेशन करायला लावण्याचा मोह कटाक्षाने टाळला पाहिजे. समाज जर डॉक्टरांकडे चुकीचा म्हणून बघू लागला तर अतिशय कष्टाने घेतलेल्या शिक्षणाचा नेमका किती उपयोग झाला हा प्रश्न उरतोच ?
- डॉ. प्रताप गोळे

Web Title: Uncooked machinery, touch of air affection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.