‘पुतण्या’च्या वाढदिवसानं ‘काका’ अस्वस्थ !
By Admin | Updated: November 18, 2015 00:09 IST2015-11-17T21:39:57+5:302015-11-18T00:09:36+5:30
भर कार्यक्रमात कानपिचक्या : म्हणे... फ्लेक्स लाऊन कुणी पुढारी होत नाही !--घडतंय बिघडतयं

‘पुतण्या’च्या वाढदिवसानं ‘काका’ अस्वस्थ !
प्रमोद सुकरे -- कऱ्हाड राज्यात अनेक पुतण्यांनी आपल्या काकांविरोधात अडचणी उभ्या केल्याच्या घटना आहेत. राज ठाकरे, धनंजय मुंडे यांनी तर घुसमट होत होती म्हणून काकांविरोधात बंडच पुकारले होते. अजितदादांमुळे पवार साहेबांनाही बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. असचं काहीसं कऱ्हाड दक्षिणेत सध्या सुरू आहे. एका पुतण्याचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा झाल्यापासून ‘काका’ भलतेच अस्वस्थ झाले आहेत. त्यावर ‘फ्लेक्स’ लावून पुढारी होता येत नाही, अशा कानपिचक्या जाहिरपणे काकांनी पुतण्याला दिल्या खऱ्या; पण त्या पुतण्याला किती रूचत्यात, हे येणारा काळच ठरविल.
गत आठवड्यात उंडाळे खोऱ्यात फटाके फुटले. मग तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष, दिवाळी तर होती ! पण विशेष आहे. कारण ते फटाके दिवाळीत फुटले असले, तरी वाढदिवसासाठी वाजविले गेले होते. अन् तो वाढदिवस होता ‘राजा’भाऊंचा!
आता हे राजाभाऊ कोण तर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्य. उंडाळे शिक्षण संस्थेचे संचालक अॅड. आनंदराव पाटील उर्फ राजाभाऊ ! ‘रयत’ साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंगराव पाटील यांचे ते चिरंजीव तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे ते पुतणे होत.
अलिकडच्या काळात राजकीय व्यक्तिंचे वाढदिवस उत्साहात करण्याची प्रथा रूढ झाली आहे; पण उंडाळकर मात्र त्याला तसे अपवाद होते. आजवर या परिवारात तालुकावार फ्लेक्स लावून कोणाचा वाढदिवस साजरा झाला नव्हता. पण राजाभाऊंच्या कार्यकर्त्यांनी यंदा तसा बेत आखला अन् जंगी कार्यक्रम झाला. राजाभाऊंना वडिलांनी आशिर्वाद दिला. पत्नी गितांजली यांनी औक्षण केले अन् शेकडो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, काका व चुलत भावांच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहचल्याच नाहीत.
याउलट विलासराव पाटीलांनी घेतलेल्या ग्रामसभेला बंधू जयसिंगराव पाटील व पुतणे राजाभाऊ गैरहजर होते. तेथे काकांनी फ्लेक्सबोर्ड लावून अन् पेपरला बातम्या छापून आणून पुढारी होता येत नाही. त्यासाठी खस्ता खाव्या लागतात, अशा कानपिचक्या पुतण्याला दिल्या. तर कोणत्या झाडाखाली बसायचं हे तुम्हीच ठरवा, असे ग्रामस्ंथांना आवाहन केले. तर अॅड. उदय पाटील मित्रमंडळाने आयोजित केलेल्या प्रीतिभोजनाच्या कार्यक्रमातही उदयसिंहांनी आपणच राजकीय पटलावरचे ‘दादा’ असल्याचे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे उंडाळे परिसरातच नव्हे तर कऱ्हाड दक्षिणमध्ये सध्या राजकीय चर्चांना ऊत आला आहे.
काही उंडाळकर समर्थक म्हणताहेत, आमच्या गटात काही मतभेद नाहीतच. काहीजण म्हणताहेत, हा किरकोळ विषय काका चुटकीसरशी मिटवून टाकणार. तर काहीजण म्हणताहेत, आता या दोन भावांच्यात दरी पडलीच. त्यामुळे हे बंड आता थंड होणार नाही. पुतण्याच्या वाढदिवसानंतर उंडाळकर पितापुत्रांनी अप्रत्यक्षपणे मात्र जाहीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कार्यकर्त्यांच्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. जयसिंगराव पाटील बापू व अॅड. आनंदराव उर्फ राजाभाऊ मात्र ‘ब्र’ शब्द काढायला तयार नाहीत. त्यांचे हे मौन किंवा त्यांनी बाळगलेली शांतता ही वादळापूर्वीची की ‘पेल्यातल वादळ पेल्यात विरघळल्याची’, हे मात्र समजायला मार्ग नाही !
...म्हणे, हे लागलंय जिव्हारी !
घरोघरी मातीच्या चुली म्हणतात. राजकारण्यांची घरेही त्याला अपवाद नाहीत. पण इतिहासात प्रथमच उंडाळेची ग्रामपंचायत निवडणूक अॅड. उदयसिंह पाटील मित्रमंडळाने लावली अन् नऊपैकी तीन जागाही घेतल्या. यात कोण हरलं, कोण जिंकलं यापेक्षा ही निवडणुकच लागली ही बाबच जयसिंगराव पाटील व अॅड. आनंदराव पाटील यांना जिव्हारी लागल्याचे बोलले जाते.
अन् हीच बाब खटकली!
अॅड. आनंदराव पाटील यांच्या वाढदिवसाला माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर व अॅड. उदयसिंह पाटील जरी गेले नसले, तरी उंडाळकरांच्या ताब्यात असणाऱ्या सर्व संस्थांचे बहुतांशी पदाधिकारी त्यांना शुभेच्छा द्यायला आले होते. पण वाढदिवसाचा केक कापायला ‘कृष्णे’चे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते उपस्थित होत,े ही बाब उंडाळकर पितापुत्रांना खटकल्याचे बोलले जातेय.