शाहूपुरीतून उदयनराजेंना नापसंती!

By Admin | Updated: May 25, 2014 00:32 IST2014-05-25T00:29:21+5:302014-05-25T00:32:46+5:30

सातारा लोकसभा निकाल : राजेंद्र चोरगेंना मिळाली ३८३ इतकी अधिक मते

Uhannarajena dislike the Shahupuri! | शाहूपुरीतून उदयनराजेंना नापसंती!

शाहूपुरीतून उदयनराजेंना नापसंती!

 सातारा : लोकसभा निवडणुकीत सातारा शहरालगतच्या शाहूपुरी परिसरातून उदयनराजेंना १८२ तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आम आदमी पार्टीचे राजेंद्र चोरगे यांना ५६५ मते मिळाली आहेत. शाहूपुरीकरांना उदयनराजेंना नापसंती दाखविल्याचेच चित्र यातून पुढे येत आहे. सातारा शहरालगतचा परिसर असणारी शाहूपुरी ही नवीन विकसित झालेली वसाहत आता चांगलीच विस्तारित झालेली आहे. येथील २३३ या मतदान केंद्रात कमालच झाली. या केंद्रावर शाहूपुरी परिसरातील करंजे तर्फ सातारा, गेंडामाळ, धर्मवीर संभाजी सोसायटी, भैरवनाथ हौसिंग सोसायटी, दत्त दिगंबर सोसायटी आदी परिसराचा समावेश होतो. लोकसभा निवडणुकीच्या मतदानात शाहूपुरीतील या परिसरातून खासदार उदयनराजे भोसले यांना अवघी १८२ मते मिळाली आहेत. तर राजेंद्र चोरगे यांना तब्बल ५६५ इतके मतदान झाले आहे. याठिकाणी ३८३ मतदारांनी उदयनराजेंना नापसंती दाखवून त्यांच्याविरोधात कौल दिला आहे. दरम्यान, सातारा शहरातील २५२ या मतदान केंद्रातही उदयनराजेंपेक्षा राजेंद्र चोरगे यांना जास्त मते मिळाली आहेत. बापूसाहेब चिपळूणकर शाळेच्या केंद्रात मंगळवार पेठ, बोरकरवाडा, चिमणपुरा पेठ, मांढरेआळी, गारेचा गणपती, पोळ वस्ती, नगरपालिका कामगार चाळ, बहुलेश्वर मंदिर, बांदेकर पूल या पश्चिम भागाचा समावेश होतो. या परिसरातून राजेंद्र चोरगे यांना २८० तर उदयराजेंना २६० मते मिळाली आहेत. याठिकाणीही चोरगे यांनी उदयनराजेंपेक्षा २० मते जास्त मिळविली आहेत. सातारा शहरातील मतदान केंद्र क्रमांक २३३ व शाहूपुरीतील मतदान केंद्र क्रमांक २५२ वगळता उदयनराजे व राजेंद्र चोरगे यांच्यातील मतदानाची तफावत फारच मोठी आहे. सातारा शहरातून एकूण ५२ हजार ६०६ इतके मतदान झाले. त्यापैकी २९ हजार ८०७ मतदान उदयनराजेंना झाले तर १२ हजार ७८४ इतके मतदान राजेंद्र चोरगे यांना झाले. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघांतून उदयनराजेंना तब्बल ८० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. (प्रतिनिधी) शाहूपुरीवर सत्ता कोणाची? शाहूपुरी ग्रामपंचायतीत सध्या उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणार्‍या कार्यकर्त्यांची सत्ता आहे. जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे व पंचायत समिती सदस्य संजय पाटील हेही उदयनराजे समर्थक आहेत. ग्रामपंचायतीवर संजय पाटील गटाची सत्ता आहे. या परिसरातील एका भागातून राजेंद्र चोरगे यांना मताधिक्य मिळाले असल्याने भविष्यात ग्रामपंचायत निवडणुकीतही चोरगेंनी पॅनेल टाकल्यास त्यांना पसंती मिळू शकते, अशी शक्यता आहे. सातारा शहरात ९८८ मते ‘नोटा’ सातारा शहरातून झालेल्या एकूण मतदानापैकी ९८८ मते ही उमेदवार नापसंती (नोटा) च्या बाजूने झाली. शहरातील दोन उमेदवार असतानाही नागरिकांनी कौल दिला आहे.

Web Title: Uhannarajena dislike the Shahupuri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.