Udayanraja's behavior is old. Need Suro and Vaidya die: Shivendra Singh Maharaj | उदयनराजेंचे वागणं जुनंच.. गरज सरो अन् वैद्य मरो : शिवेंद्रसिंहराजे
उदयनराजेंचे वागणं जुनंच.. गरज सरो अन् वैद्य मरो : शिवेंद्रसिंहराजे

ठळक मुद्देउदयनराजेंचे वागणं जुनंच.. गरज सरो अन् वैद्य मरो : शिवेंद्रसिंहराजे सातारा-जावळीतील जनतेशी आपुलकीचं सेटिंग

सातारा : रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वादाशी माझा दूरवर कसलाही संबंध नाही. त्यामुळे माझे आणि रामराजेंचे सेटिंग, संगनमत आहे, हे खासदारांचे विधान हास्यास्पद आहे. माझे सेटिंग फक्त सातारा आणि जावळीतील जनतेशी आहे आणि तेही आपुलकी, प्रेम आणि विकासकामांपुरते आहे. गरज सरो अन् वैद्य मरो, ही खासदारांची जुनी सवय असून, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना येत आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

खा. उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे आणि रामराजे यांच्यात संगनमत असल्याचे वक्तव्य केले होते. यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले. लोकसभा निवडणुकीत मी पक्षाशी प्रामाणिक राहून उदयनराजेंचे काम केले. माझ्या मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्यावरून ते सिद्ध होत असून, सातारकर जनतेनेही हे पाहिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी अगदी नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी खा. उदयनराजेंची भाषा आणि वागणे कसे होते, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्यात कसा आणि किती फरक पडला, हेही जनतेने जवळून पाहिले आहे आणि लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या वागण्यात, बोलण्यात काय बदल झाला आहे, हे सगळ्यांनाच दिसत आहे.

नीरा-देवघरच्या पाण्याशी माझा आणि माझ्या मतदार संघाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे उदयनराजे आणि रामराजे यांच्यात सुरू असलेले भांडण कशासाठी आहे, हे मला माहिती नाही आणि माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर माझ्या मतदारसंघात ज्या काही गोष्टी मला जाणवल्या, त्या मी पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्या कानावर घातल्या. मी काम केलं का नाही, हे जनतेने पाहिले आहे आणि मताधिक्यावरूनही स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत उदयनराजे जे बोलत होते, त्याप्रमाणे त्यांनी वागणे अपेक्षित आहे.

माझा काय संंबंध...?

कोण कसं वागतंय, हे सातारकरांनी व सातारा-जावळीतील जनतेनं बघावं. कोणं कसं बदललंय, हेही पाहावं. मी सातारा- जावळीतील जनतेशी नेहमीच बांधील राहिलो आहे आणि यापुढेही कायम बांधील राहणार आहे. सातारकर आणि माझ्या मतदार संघातील जनतेमुळेच मी आहे. हे मी कदापि विसरत नाही आणि त्यामुळेच माझ्या वागण्यात आणि बोलण्यात कधीही बदल दिसणार नाही. त्यामुळे खासदारांनी संबंध नसलेल्या गोष्टींशी माझा संबंध लावू नये आणि उगाच दिशाभूल करू नये, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.


Web Title: Udayanraja's behavior is old. Need Suro and Vaidya die: Shivendra Singh Maharaj
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.