उदयनराजे, जयकुमार, विलासकाका बाहेरच !
By Admin | Updated: May 19, 2015 00:32 IST2015-05-18T23:05:19+5:302015-05-19T00:32:09+5:30
जिल्हा बँक कार्यकारी कमिटी : मात्र विरोधकांना मिळणार इतर ठिकाणी संधी

उदयनराजे, जयकुमार, विलासकाका बाहेरच !
सागर गुजर - सातारा -जिल्हा मध्यवर्ती बँकेतील धोरणात्मक निर्णयांचा आत्मा असणाऱ्या कार्यकारी समितीपासून विरोधकांना दूर ठेवण्याची परंपरा याहीवेळी अबाधित राहण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेही या समितीत नसणार, हे आता स्पष्ट झाले असून, आ. जयकुमार गोरे व बँकेचे माजी अध्यक्ष विलासराव पाटील-उंडाळकर यांनाही कार्यकारी समितीच्या बाहेर ठेवल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
बँकेतील धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार कार्यकारी समितीला आहेत. मागील आठ वर्षांच्या कालावधीमध्ये २४ संचालकांपैकी २१ संचालकांना या समितीत संधी देण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून निवडून आलेल्या संचालकांनाच या समितीत घेण्यात आले होते. उदयनराजे विरोधात निवडून आले असल्याने त्यांना या समितीत घेतले गेले नाही. अनेक वर्षे बँकेचे सर्वेसर्वा ठरलेल्या विलासराव पाटील-उंडाळकरांना प्रथमच या समितीच्या बाहेर राहावे लागले होते.
नवीन संचालक मंडळांतील २१ पैकी १८ संचालक राष्ट्रवादीचे आहेत. या १८ संचालकांना कार्यकारी समितीत संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे उदयनराजेंसह, आ. गोरे व विलासकाका हे तिघेजण परकेच राहणार आहेत.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तर उपाध्यक्षपदी सुनील माने यांची नियुक्ती झाली आहे. संचालक मंडळाने समितीच्या निवडीबाबतचे सर्व अधिकारी शिवेंद्रसिंहराजेंना दिले आहेत. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या दृष्टीने उदयनराजे हे दोघांनाही जवळचे आहेत. शिवेंद्रसिंहराजे तर उदयनराजेंचे धाकटे बंधू आहेत. सातारा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोघांच्या मनोमिलनाची सत्ता आहे. या परिस्थितीत उदयनराजे कार्यकारी समितीत दिसतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीने विरोधकांना कार्यकारी समितीचे दरवाजे बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय आधीच घेतला होता. त्यात आता बदल होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.बँकेच्या निवडणुकीत उदयनराजेंना बिनविरोध करून राष्ट्रवादीने एक चाल खेळली. उदयनराजे बिनविरोध झाले; मात्र ते सत्तेत नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.
शनिवारी बोर्ड कमिटीची बैठक
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बोर्ड कमिटीची प्राथमिक बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती. या बैठकीत कमिट्यांबाबतच्या चर्चाही झाली होती. येत्या दोन दिवसांत कार्यकारी समित्यांसह इतर समित्यांत कोणाकोणाची वर्णी लागणार हे कळेल. शनिवारी संचालक मंडळाची बैठक होणार आहे.
इतर समित्यांत संधी शक्य
जिल्हा बँकेत नियोजन, आॅडिट, संगणक, सेवक, सोने गहाण, इमारत, अनिश्चित पट अशा समित्या असणार आहेत, या समित्यांवर विरोधकांना संधी देण्यात येऊ शकते.